अज्ञात व्यक्तीची हत्या करुन सात तुकडे करुन फेंकून दिले
बोरिवलीतील घटना; मारेकर्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – अज्ञात व्यक्तीची हत्या करुन त्याच्या शरीराचे सात तुकडे चार वेगवेगळ्या ड्रममघ्ये प्लास्टिक डब्ब्यात भरुन फेंकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बोरिवलीतील गोराई परिसरात उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याचे शिर, हात, पाय आणि धड ताब्यात घेऊन ते कांदिवलतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. गोराईतील झाडाझुडपांनी वेढलेल्या खड्ड्यामध्ये दुर्गधी येऊ लागल्याने हत्येचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
बोरिवलीतील गोराई, बाबरपाडा, शेफाली गाव परिसरात सात वेगवेगळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळून चार ड्रममध्ये एका अज्ञात व्यक्तीचे मृतदेहाचे तुकडे फेंकून देण्यात आले होते. या परिसरात प्रचंड दुर्गधी येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी ड्रममधील प्लास्टिकची गोणी उघडून पाहिल्यानंतर त्यात एका व्यक्तीच्या शरीराचे तुकडे असल्याचे दिसून आले. या प्रकाराने तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून मिळताच गोराई पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना चार ड्रममध्ये संबंधित अज्ञात व्यक्तीचा मृतदेहाचे तुकडे दिसून आले. या व्यक्तीची हत्या केल्यानंतर त्याचे शिर, हात, पाय आणि धड वेगळे करण्यात आले होते. ते अवयव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेमधील जंगलसदय झाडीमध्ये टाकून मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अंदाजे चार ते पाच दिवसांपूर्वी संबंधित तुकडे तिथे टाकण्यात आले होते. धारदार हत्यार किंवा कटरच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
एका ड्रममध्ये पोलिसांनी एक पॅण्ट आणि बूट सापडले. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. त्याचे वय अंदाजे २५ ते ४० असे आहे. त्याची त्याची ओळख पटली नव्हती. त्याच्या उजव्या हातावर आरके असे टॅटू होते. त्यामुळे उजव्या हातावर टॅटू असलेल्या व्यक्तीची माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत मिसिंग असलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती काढण्याचे काम सुुरु आहे. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकर्यांनी ड्रमचा वापर केला होता. ते चारही ड्रम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या ड्रमचा वापर पाण्यासाठी केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गोराई गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. गुन्ह्यांच्या तपासाकामी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे दोन पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच मृतदेहाची ओळख पटेल आणि मारेकर्यांना अटक केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. आर्थिक अथवा प्रेमसंबंधातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.