मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – एका महिन्यांत दुप्पट रक्कमेच्या आमिषाने एका ६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच भाडेकरुंनी फसवणुक केल्याचा प्रकार गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सपना वजीर आणि अजान वजीर अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
रुची अरविंद गुप्ता ही तक्रारदार वयोवृद्ध महिला अंधेरीतील लिंक रोड, रहेजा क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या मालकीचा गोरेगाव येथील इम्पेरियल हाईट्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट आहे. याच फ्लॅटमध्ये सपना आणि अजान हे दोघेही भाडेकरु म्हणून राहतात. या दोघांनी तिला दुप्पट रक्कमेची योजना सांगून तिला या योजनेत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. गुंतवणुक केलेली रक्कम एका महिन्यांत दुप्पट होईल असे सांगून या दोघांनी तिला विश्वास संपादन केला होता. त्यांच्या दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून तिने १६ एप्रिल २०२४ रोज या दोघांना आरटीजीएसद्वारे पाच तर धनादेशद्वारे चार लाख असे नऊ लाख रुपये दिले होते. मात्र एक महिन्यानंतर त्यांनी तिला दुप्पट रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. चार महिने उलटूनही त्यांनी दुप्पट रक्कम दिली नाही. त्यामुळे तिने गोरेगाव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सपना वजीर आणि अजान वजीर यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.