खंडणीसाठी अल्पवयीन मित्राला धमकाविणार्‍या आरोपीस अटक

अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२४
मुंबई, – खंडणीसाठी सोळा वर्षांच्या अल्पवयीन मित्राला धमकाविणार्‍या सुमीत सिंग नावाच्या एका आरोपीस वनराई पोलिसांनी अटक केली आहे. अज्ञात मुलीशी केलेल्या व्हिडीओ कॉलचे रेकॉडिंग करुन त्यांच्यातील अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याच्याकडून खंडणीची मागणी करुन खंडणीस्वरुपात एक लाख रुपयांच्या कॅशसह सोन्याचे दागिने वसुल केले होते. याच गुन्ह्यांत सुमीतला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

तक्रारादार महिला अणि तिचे पती डॉक्टर असून ते गोरेगाव परिसरात राहतात. त्यांना एक सोळा वर्षांचा मुलगा असून त्याला एडीएचडी नावाचा एक आजार आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या स्वभावात प्रचंड बदल झाला होता. तो फारसा कोणाशी बोलत नव्हता, घरी जेवत नव्हता. सकाळी घरातून निघून गेल्यानंतर रात्री उशिरा घरी येत होता. तो सतत कुठल्या तरी विचारत दिसत होता. हा प्रकार विचित्र वाटल्याने तिच्या आईने त्याच्याकडे आपुकीने विचारपूस केली होती. यावेळी त्याने घडलेला प्रकार त्यांच्या आईला सांगितला. त्याचा सुमीत नावाचा एक मित्र आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने त्याच्या मोबाईलवरुन एका मुलीला हाय असा मॅसेज पाठविला होता. त्याच रात्री त्या मुलीने त्याला व्हिडीओ कॉल केला होता. त्याने कॉल घेतल्यानंतर त्या मुलीने स्वतचे कपडे काढण्यास सुरुवात करुन त्याला कपडे काढण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तिने त्यांच्यातील अश्‍लील व्हिडीओ रेकॉर्डिंग केले होते. ते व्हिडीओ नंतर त्याला पाठवून तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्याच्याकडे पैशांची मागणी करु लागली. पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन त्याच्यासह कुटुंबियांची बदनामीची धमकी दिली होती.

या प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि घडलेला प्रकार त्याने सुमीतला सांगितला. यावेळी सुमीतने तिला पैसे देऊन प्रकरण मिटविण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर या मुलीचा त्याला कॉल आला नाही. मात्र त्याने त्याचे अश्‍लील व्हिडीओ सुमीतला शेअर केला होते. हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला होता. या मुलीनंतर तो त्याच्याकडे पैशांची मागणी करु लागला. त्याला पैसे दिले नाहीतर तोच त्याचे न्यूड व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यामुळे त्याने आजीच्या घरातून एक लाख रुपयांची कॅश आणि सोन्याचे दागिने चोरी करुन सुमीतला दिले होते. पैसे आणि दागिने दिल्यानंतरही सुमीतकडून त्याला ब्लॅकमेल करुन धमकी दिली जात होती. ही माहिती समजताच त्याच्या आईने सुमीतविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा नोंदवून सोमवारी सुमीतला ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉल करणार्‍या मुलीशी सुमीतचा काय संबंध आहे, त्यानेच तिला पिडीत मुलाला व्हिडीओ कॉल करुन पैशांची मागणी करण्यास सांगितले होते का, या गुन्ह्यांत सुमीत हा मुख्य आरोपी असल्याने त्याने या मुलीचा कशा प्रकारे वापर केला. तिला किती रुपये दिली होते. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page