मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जानेवारी २०२४
मुंबई, – गोरेगाव पूर्वे आणि पश्चिम या ठिकाणी दोन अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. मृतांमध्ये साहिल संतोष झुझम आणि अक्षय पायगुडे यांचा समावेश आहे तर महेंद्र इंगले आणि अजय हाथेकर या दोघांवर दोघांवर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी आरे आणि गोरेगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका ट्रकचालकास अटक केली आहे.
पहिला अपघात रविवारी रात्री उशिरा गोरेगाव येथील आरे कॉलनीत झाला. मोहम्मद आयुब हा ट्रकचालक असून तो रविवारी रात्री गोरेगाव येथून पवईच्या दिशेने जात होता. रात्रीची वेळ असल्याने तो भरवेगात ट्रक चालवत होता. आरे कॉलनीजवळ त्याने एका बाईकला जोरात धडक दिली. त्यात महेंद्र इंगले आणि साहिल झुझम असे दोन तरुण जखमी झाले. या दोघांनाही जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे साहिलला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर महेंद्रची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अंधेरीतील सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने धाव घेतली होती. याप्रकरणी मृत साहिलचे वडिल संतोष झुझम यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ट्रकचालक मोहम्मद आयुबला पोलिसांनी अटक केली.
दुसरा अपघात सोमवारी सकाळी गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, शहिद भगतसिंग नगर परिसरात झाला. सोमवारी पहाटे अक्षय हा त्याचा मित्र अजय हाथेकरसोबत जात होता. यावेळी त्यांच्या वाहनाने कचरा वाहून नेणार्या एका गाडीला जोरात मागून धडक दिली होती. या अपघातात अक्षय आणि अजय हे दोघेही जखमी झाले होते. त्यांना जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर अक्षयला मृत घोषित करण्यात आले तर अजयवर तिथे उपचार सुरु आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाताची नोंद करुन तपास सुरु केा आहे.