जावयाचे अपहरण करुन कोंडून ठेवलेल्या रुममध्ये बेदम मारहाण
लग्नातील खर्चासह साहित्य परत करण्यासाठी घडलेला प्रकार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मे २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून २४ वर्षांच्या जावयाचे अपहरण करुन कोंडून ठेवलेल्या रुममध्ये लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपरणासह भादवीच्या विविध कलमांतर्गत पाचजणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. फिरोज अन्सारी, जाफर खान, कलीम अन्सारी, अफजल अन्सारी आणि जग्गू अन्सारी अशी या पाचजणांची नावे आहेत. लग्नातील दोन लाखांच्या खर्चासह लग्नात दिलेले साहित्य परत करण्यासाठी हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
व्यवसायाने रिक्षाचालक असलेला अक्रम हैदर अली कुरेशी (२४) हा गोवंडीतील शिवाजीनगर, बैंगनवाडी परिसरात राहतो. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्याचे सकिना खातून या तरुणीशी विवाह झाला होता. तेव्हापासून ती त्यांच्यासोबत राहत होती, मात्र एक महिन्यांपूर्वी तिच्या पालकांनी तिला वसई येथील सासरी घेऊन गेले होते. ती अद्याप त्याच्या घरी आली नाही. काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु आहे. याच वादातून मार्ग काढण्यासाठी त्यांचे सासरे फिरोज अन्सारी याने त्याला बोलाविले होते. त्यामुळे तो २५ मेला सायंकाळी सहा वाजता मानखुर्द येथील साठेनगरात चर्चा करण्यासाठी गेला होता, यावेळी फिरोजसह त्यांच्या नातेवाईकांनी त्याचे कारमधून अपहरण करुन त्याला वसईतील एका फ्लॅटमध्ये आणले. तिथे त्याला डांबून ठेवून त्यांनी त्याला बेदम लाथ्याबुक्यांनी माहराण केली होती. यावेळी फिरोजने त्याच्याकडे लग्ना झालेला दोन लाखांचा खर्चासह लग्नात दिलेले सर्व साहित्य परत करण्याची मागणी केली होती. हा मुद्देमाल परत केला नाहीतर त्याची सुटका करणार नाही. जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
हा प्रकार नंतर अक्रमकडून त्याच्या आईला समजला होता. त्यामुळे तिने शिवाजीनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्या मुलाची सुटका करण्याची विनंती केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत अक्रमचा शोध सुरु केला होता. तपासात त्याला वसईतील एका रुममध्ये डांंबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या रुममधून अक्रमची सुखरुप सुटका केली. अक्रमच्या चौकशीतून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याचे सासरे फिरोज अन्सारी, इतर चार नातेवाईक जाफर खान, कलीम अन्सारी, अफजल अन्सारी आणि जग्गू अन्सारी यांच्याविरुद्ध ३६४ अ, ३४२, ५०६ (२), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.