प्रेम करण्यास प्रवृत्त करुन शारीरिक संबंधास भाग पाडले
अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरुन प्रेयसीविरुद्घ गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – प्रेम करण्यास प्रवृत्त करुन एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रेयसीविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून प्रेयसीची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहे. या प्रेयसीचे त्यांच्यातील व्हिडीओ पोलिसांना देऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा करण्याची धमकी देऊन लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
१७ वर्षांचा पिडीत अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबियांसोबत गोवंडीतील बैंगनवाडीत राहतो. आरोपी तरुणी त्याच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांना ओळखतात. तिचे त्याच्यावर प्रेम होते. तो अल्पवयीन असल्याचे माहित असताना ती त्याच्याशी सतत फोनवरुन संभाषण करत होती. तिचे त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिने त्याला तिच्याशी प्रेम करण्यास प्रवृत्त केले होते. काही दिवसानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तिच्या सांगण्यावरुन तो तिच्या घरी आला होता. यावेळी या दोघांना तिच्या पालकांनी रंगेहाथ पकडले होते. त्यांचे मोबाईलवरुन व्हिडीओ शूटींग केले होते. तो व्हिडीओ पोलिसांना दाखवून त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार करण्याची धमकी देऊन तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील एका गार्डनजवळ तिने भाड्याने रुम घेतला होता. तिथेच तिने त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते.
मार्च ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार सुरु होता. तिच्याकडून सुरु असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तिने हा प्रकार त्याच्या पालकांना सांगितला होता. त्यानंतर त्यांनी त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले होते. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याने त्याच्याच प्रेयसीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याने तिच्यावर अद्याप अटकेची कारवाई झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.