लाईट बिल भरण्यावरुन ४९ वर्षांच्या घरमालकाची हत्या
गोवंडीतील घटना; भाडेकरुविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मे २०२४
मुंबई, – लाईट बिल भरण्यावरुन झालेल्या वादातून एका ४९ वर्षांच्या घरमालकाची भाडेकरुने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना गोवंडी परिसरात उघडकीस आली आहे. गणपती शारदानंद झा असे या मृत घरमालकाचे नाव असून त्यांच्या हत्येप्रकरणी अब्दुल सुभान मेनामुल्ला शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
६१ वर्षांचे दिनेश योगेंद्र झा हे गोवंडीतील देवनार परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते परिसरातील हनुमान मंदिरात पुजारी तर कुर्ला येथील एका रेडीमेंड सेंटर दुकानात कामाला आहेत. गणपती हा त्यांचा चुलत भाऊ असून तो बैंगणवाडी, गणेश हॉलजवळील संजयनगर परिसरात राहतो. त्याच्या पत्नीचे निधन झाले असून दोन्ही मुलींचे लग्न झाले आहेत. त्यामुळे तो तिथे एकटाच राहत होता. त्याचा जयदेव हा भाऊ असून तो सध्या बिहार येथे वास्तव्यास आहे. गणपतीला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यातून दिनेश आणि गणपती यांच्यात नेहमीच वाद होत होते. मंदिरात येऊन त्याने अनेकदा गोंधळ घातल्याने त्याला मंदिरात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी गणपती हा त्याच्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता गणपती हा बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आला. त्यामुळे त्याला जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. त्याचे शरीर फुगलेले होते,तसेच त्याच्या तोंडातून आणि नाकातून लाल रंगाचे द्रव्य बाहेर येत होते. त्यामुळे त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला.
चौकशीअंती गणपतीच्या घरी अब्दुल शेख हा भाडेकरु म्हणून राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे अब्दुलशी लाईट बिल भरण्यावरुन वाद झाला होता. या भांडणानंतर त्याला अब्दुलने लाकडी दांड्याने हातोडीने बेदम मारहाण केली होती. काही प्रत्यक्षदर्शीनी हा प्रकार पोलिसांना सांगिला होता. अब्दुलच्या मारहाणीत गणपतीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येसह शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.