मुलीला मारतो म्हणून जावयावर सासर्यासह मित्राकडून हल्ला
गोवंडीतील घटना; चौघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मार्च २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून मुलीला मारहाण करतो म्हणून सासर्यानेच त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने ३६ वर्षांच्या जावयावर लोखंडी रॉड, पेव्हर ब्लॉक आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. या हल्ल्यात प्रदीप बबन जाधव हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्या डोक्याला, पाठीला, दोन्ही हातासह पायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी आरोपी सासरा मनोज पाटील व त्याच्या तीन मित्रांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. या चौघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास गोवंडीतील सम्राट अशोकनगर रेल्वे पटरीजवळील मोकळ्या मैदानात घडली. याच परिसरातील आठवले चाळीत प्रदीप हा त्याची आई सत्वशिला, पुतण्या आदित्यासोबत राहतो. तो कुलाबा बस डेपोमध्ये इलेक्ट्रीक विभागात कामाला असून त्यातून मिळणार्या पगारातून त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. सहा वर्षांपूर्वी त्याचे प्रज्ञा या महिलेशी विवाह झाला होता. मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. हा वाद विकोपास गेल्याने गेल्या दहा महिन्यांपासून प्रज्ञा ही तिच्या माहेरी राहत होती. ती लोअर परेल येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यामुळे तिच्याशी बोलण्यासाठी प्रदीप हा २७ फेब्रुवारीला तिच्या कामाच्या ठिकाणी गेली होती.
यावेळी त्याची पत्नी प्रज्ञा ही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत जात असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे तो तिच्या मागून चालत होता. तिचे मोबाईलवरील संभाषण खटल्याने त्याने तिचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मोबाईल बॅगेत ठेवून ती तेथून निघून गेली. तेथून तो कौपरखैरणे येथे जाणार होता, मात्र घडलेल्या प्रकारानंतर तो तिथे न जाता घरी निघून गेला. रात्री जेवण झाल्यानंतर तो साडेनऊ वाजता सम्राट अशोकनगर येथील मोकळ्या मैदानात बसला होता. यावेळी तिथे त्याचे सासरे मनोज पाटील व त्याचे तीन मित्र आले होते. काही कळण्यापूर्वीच या चौघांनी त्याच्यावर लोखंडी रॉड, पेव्हर ब्लॉक आणि दगडाने बेदम मारहाण केली. माझ्या मुलीला मारतोय काय, आज तुझा गेम करतो अशी धमकी देऊन मनोज व इतर तिघांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली होती. या मारहाणीत प्रदीपच्या डोक्याला, छातीला, पाठीला, दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता. मारहाणीनंतर ते चौघेही तेथून पळून गेले.
रक्तबंबाळ झालेल्या प्रदीपला नंतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रदीप जाधवची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सासरा मनोज पाटीलसह इतर तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. पळून गेलेल्या चारही मारेकर्यांचा पोलीस शोध घेत आहेत.