मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२४
मुंबई, – ग्रँटरोड येथील एका कुंटनखान्यात डांबून ठेवलेल्या महिलांच्या मदतीने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा डी. बी मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी हाफिजा फकीरअली मंडल या ४० वर्षांच्या मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिघींनाही चेंबूरच्या नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत कुंटनखान्याचा मालक चंद्रा गौड याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
गेल्या काही महिन्यांत ग्रँटरोड परिसरात सुरु असलेल्या अनेक कुंटनखान्यात स्थानिक पोलिसांसह समाजसेवा शाखेच्या अधिकार्यांनी कारवाई केली होती. तिथे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन काही दलालांना अटक करुन मोठ्या प्रमाणात डांबून ठेवलेल्या तरुणीसह महिलांची सुटका केली होती. तरीही काही ठिकाणी विविध आमिष दाखवून इतर राज्यातून महिलांना आणून, तिथे महिलांना डांबून ठेवून त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात होते. त्यामुळे अशा कुटुंनखान्याची माहिती काढून पोलिसांनी कारवाई सुरु केली होती. याच दरम्यान ग्रँटरोड येथील पाववाला पथ, कृष्णा इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील कुुंटनखान्यात सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने सोमवारी रात्री उशिरा तिथे छापा टाकला होता. यावेळी तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने कुंटनखान्याची मॅनेजर हाफिजा मंडल या महिलेस अटक केली तर तिथे असलेल्या तीन महिलांची सुटका केली. या महिलांच्या चौकशीतून त्यांना तिथे डांबून ठेवून ग्राहकांसोबत जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या तिघींनाही नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांची नवजीवन महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली. हाफिजा ही कुंटनखान्यात मॅनेजर म्हणून काम करत होती. त्याचा मालक चंद्रा गौड असून तो कारवाईपूर्वीच पळून गेला होता. त्यामुळे या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.