हवालामार्फत तीन लाख घेतल्यानंतर वीस लाख घेताना रंगेहाथ पकडले
जीएसटी अधिक्षकासह सनदी लेखापाल व खाजगी व्यक्तीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – अटकेची भीती दाखवून एका व्यावसायिकाकडून हवालमार्फत तीस लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर लाचेचा दुसरा वीस लाख रुपयांचा हप्ता घेताना केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधिक्षक, वरिष्ठ सनदी लेखापाल आणि खाजगी व्यक्ती अशा तिघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. या तिघांनी व्यावसायिकाकडे ऐंशी लाखांची मागणी केल्यानंतर त्यांच्यात साठ लाखांवर सौदा पक्का झाला होता, त्यापैकी तीस लाख रुपये हवालामार्फत घेण्यात आले होते, मात्र दुसरा हप्ता घेताना या तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. जीएसटीच्या अधिक्षकासह वरिष्ठ सनदी अधिकारी लाचेच्या सापडल्याने संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
सांताक्रुज परिसरात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे एक कार्यालय आहे. या कार्यालयात आरोपी अधिक्षक आणि वरिष्ठ लेखापाल म्हणून कामाला आहेत. बुधवारी ४ सप्टेंबरला जीएसटीच्या एका विशेष पथकाने तक्रारदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांना चौकशीच्या नावाने दुसर्या दिवशी सायंकाळी पाचपर्यंत तिथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर अटकेची कारवाईची धमकी देत त्यांच्याकडे ऐंशी लाखांची लाचेची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना साठ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी त्यांना त्यांच्या चुलत भावाशी संपर्क साधून त्यांना पैशांची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तीस लाख रुपये हवालामार्फत पाठविण्यात आले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर तक्रारदार सीबीआय कार्यालयात धाव घेऊन तिथे उपस्थित अधिकार्यांना घडलेला प्रकार सांगून संबंधित जीएसटी अधिक्षक, विशेष सनदी अधिकारी आणि खाजगी व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचेचा दुसर्या वीस लाख रुपयांचा हप्ता घेऊन तक्रारदार पुन्हा त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी लाचेची ही रक्कम घेताना सनदी अधिकार्यासह खाजगी व्यक्तीला या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले.
यावेळी या दोघांनी जीएसटी अधिक्षकाच्या सांगण्यावरुन ही रक्कम घेतल्याचे तसेच ही रक्कम त्यांना देण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर या अधिकार्यांनी त्यांना ओशिवरा येथे जीएसटी अधिक्षकाकडे पाठविले होते. यावेळी सीबीआयच्या अधिकार्यांनी ही लाच घेताना अधिक्षकाला ताब्यात घेतले होते. लाचप्रकरणी अटक केल्यानंतर या तिघांनाही विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी जीएसटी अधिक्षक आणि सनदी अधिकार्याला सीबीआय कोठडी तर तिसर्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेच्या कारवाईनंतर संबंधित तिघांच्या मुंबईच्या घरासह कार्यालय आणि इतर ठिकाणी या अधिकार्यांनी छापे टाकले होते. या कारवाईत काही आक्षेपार्ह दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहे.