घरफोडीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
युपीच्या पाच गुन्हेगारांना अटक; अनेक गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका आंतरराज्य टोळीचा कस्तुरबा मार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. शादाब अकबर हुसैन, अमीर शम्मी मोहम्मद सोहिल, सलमान तस्लीम नदाफ, एजाज रमजानी अन्सारी आि शकील अन्वर अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण उत्तरप्रदेशच्या बिजनोर, बेहरमाबादचे रहिवाशी आहेत. या आरोपींच्या अटकेने अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडे चोरीसह इतर साहित्य पावणेबारा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याचे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले. अटकेनंतर पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवारी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी ही माहिती दिली. विनय विश्वनाथ वरगावकर हे व्यवसायाने फोटोग्राफर असून ते बोरिवलीतील टाटा टॉवर, सक्रमण शिबीर परिसरात राहतात. १३ ऑगस्टला त्यांच्या घरी घरफोडी झाली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी वाढत्या घरफोडीच्या घटनेची दखल घेत कस्तुरबा मार्ग पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी एका फुटेजमध्ये पोलिसांना रिक्षातून एक संशयित तरुण तक्रारदाराच्या इमारतीमध्ये घुसल्याचे आणि नंतर घाईघाईने बाहेर जाताना दिसून आला. या फुटेजवरुन पोलिसांनी रिक्षाचा क्रमांक प्राप्त करुन मालकाला ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने त्याची रिक्षा त्याने त्याच्या मालाडच्या मालवणीतील मेहुण्याला दिल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने मालवणीतून त्याच्या मेहुण्याची चौकशी केली होती.
या चौकशीत त्याने त्याचे उत्तरप्रदेशातून काही मित्र आले होते, त्याने त्यांना रिक्षा तसेच त्यांच्याकडे एक राखाडी रंगाची दिल्ली पासिंग क्रमांकाची हुंडाई वेरणा कार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने त्यांना फोन करुन मिरारोड येथे भेटण्यासाठी बोलाविले होते. आरोपीची ओळख पटल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर गायके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश नंदीमठ, पोलीस निरीक्षक मनोज चाळके, विजय पांचाळ, सचिन गवस, ऋषी इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे, धिरज वायकोस, पोलीस हवालदार पेडणेकर, महेंद्र महाले, राहुल सांगळे, अमोल फोपसे, विकेश शिंगटे, तुषार पुजारी यांनी मिरारोड येथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. मात्र संबंधित आरोपी तिथे आले नाही. मोबाईल लोकेशनवरुन ते मुंबईपासून ६० किलोमीटर मनोर येथे असल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने त्याचा पाठलाग सुरु केला होता. अखेर जव्हार-मोखाडाहून नाशिक मार्गाने जाणार्या हुंडाई वेरणा कार थांबवून पोलिसांनी पाचही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत याच टोळीने विनय वरगावकर यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली.
या कबुलीनंतर त्यांच्याकडून पोलिसांनी तीस हजाराचा एक लॅपटॉप, साडेसहा लाखांचे विविध सोन्याचे दागिने, ५० हजाराचे चांदीचे दागिने, कॉईन, बिस्कीटे, ऑलिपंस कंपनीचे दोन कॅमेरे, यासिका कंपनीचा एक कॅमेरा, गुन्ह्यांतील हुंडाई वेरणा कार आणि एक रिक्षा, गुन्ह्यांत वापरलेले हत्यारे, दोन लोखंडी स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, स्क्रू पाना आणि दोन लोखंडी काणस आदी ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी असून आंतरराज्य टोळीतील घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. काही दिवसांपूर्वी या टोळीने घाटकोपरच्या पंतनगर परिसरात घरफोडी केली होती. जप्त मुद्देमाल याच गुन्ह्यांतील असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अटकेने कस्तुरबा मार्ग, पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतीन तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एजाविरुद् अहमदाबादच्या पानपुर, मणिनगर, चांदखेडा, पालडी, डिसा, उंजा, सायला, निमडी, छोटा चिलोडा पोलीस ठाण्यात चौदा, अमीरविरुद्ध कांदिवलीसह अहमदाबादच्या चांदखेडा, कलोल पोलीस ठाण्यात चारहून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ही टोळी मुंबईसह अहमदाबाद शहरात घरफोडीनंतर दिल्ली आणि उत्तरप्रदेशात जात होती. काही दिवस शांत बसल्यानंतर ते सर्वजण पुन्हा घरफोडीसाठी मुंबईसह इतर शहरात जात होती. दिवसभर रेकी केल्यानंतर ते संबंधित फ्लॅटला टार्गेट करुन घरफोडी करत होते. अटकेनंतर या पाचही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने घरफोडीच्या इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.