हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याच्या आमिषाने फसवणुक
बॅडमिंटन कोचच्या तक्रारीवरुन पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याच्या आमिषाने एका बॅटमिंटन कोचची सुमारे पावणेअकरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन महिलांसह पाचजणांविरुद्ध नेहरुनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सरस्ती संदीप पाचरे, संदीप पाचरे, राजेंद्र ऊर्फ राजू ओमकार गांगुर्डे, जगदीश रणखांबे आणि निर्मला रणखांबे अशी या पाचजणांची नावे असल्याचे पोलिसांनी संागितले. याच गुन्ह्यांत पाचही आरोपींना चौकशीसाठी समन्स बजाविले जाणार आहे.
हेमंत महेंद्र सिंग हा तरुण त्याच्या आई-वडिलांसोबत कुर्ला येथील हलावपुल, पाईप लाईन रोडच समाधान सोसायटीत राहतो. त्याचे वडिल महेंद्र सिंग यांचा बर्फाचा व्यवसाय आहे तर तो स्वत बॅडमिटंनचा कोच म्हणून काम करतो. त्याला स्वतचा शर्ट बनविण्याचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्याचा फ्लॅट लहान असल्याने त्याला हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट हवा होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्या परिचित मित्रांना ही माहिती सांगितली होती. याच दरम्यान त्याच्या वडिलांनी मित्राने त्यांना राजेंद्र या इस्टेट एजंटविषयी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी राजेंद्रला संपर्क साधून त्याच्याकडे हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट असेल तर त्यांना सांगण्याची विनंती केली होती. सप्टेंबर २०२३ रोजी त्याने त्यांना चेबूरच्या शेल कॉलनीतील सम्राट अशोकनगरमधील सरस्वती आणि संदीप पाचरे यांचा एक फ्लॅट दाखविला होता. यावेळी या दोघांनी त्यांनी दुसरा फ्लॅट घेतल्याने त्यांचा हा फ्लॅट त्यांना हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात पावणेअकरा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने देण्याबाबत एकमत झाले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी पाचरे पती-पत्नीला पावणेअकरा लाख रुपये दिले होते. यावेळी या दोघांनी एक महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले. मात्र एक महिना उलटूनही त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही.
काही दिवसांनी हेमंत सिंगला तो फ्लॅट पाचरे कुटुंबियांचा नसून निर्मला रणखांबे यांच्या मालकीचा असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी पाचरे पती-पत्नीला संपर्क साधला असता त्यांनी फ्लॅटचा पॉवर ऑफ ऍटनी त्याच्याकडे असून त्याला निर्मला आणि जगदीश या बहिण-भावासोबत फ्लॅटचा करार करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी भाडे करार बनवून त्यांना दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. हेव्ही डिपॉझिटच्या नावाने या पाचही आरोपींनी संगनमत करुन त्यांच्याकडून घेतलेल्या पावणेअकरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी नेहरुनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सरस्वती पाचरे, संदीप पाचरे, राजेंद्र ऊर्फ राजू, जगदीश रणखांबे आणि निर्मला रणखांबे यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच पाचही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर द्यायचे आहे असे सांगून इतर कोणाची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.