मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटचा अपहार केल्याप्रकरणी तबरेज अहमद रेहमान शेख या घरमालकाला ताडदेव पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. याच गुन्ह्यांत इरफान शेख आणि इरफान कुरेशी हे दोघेही सहआरोपी असून या तिघांनी हेव्ही डिपॉझिटच्या नावाने तक्रारदाराकडून घेतलेल्या साडेसोळा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर तबरेजला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. हेव्ही डिपॉझिटवर घर द्यायचे आहे असे सांगून या तिघांनी अशाच प्रकारे फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
रामकैलास पहाडी कश्यप हे मूळचे उत्तरप्रदेशच्या प्रयागराज, गडचंपाचे रहिवाशी आहेत. ते वरळीतील एका दुकानात कामाला आहे. त्यांच्या मालकीचे मुंबई शहरात स्वतचे घर नसल्याने ते त्यांच्या मालकाच्या घरी वीस वर्षांपासून राहत होते. त्यांचे कुटुुंबिय मुंबईत येणार असल्याने त्यांनी त्यांच्या मालकांना भाड्याने घर घेण्यास मदत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याच्या मालकांनी त्याला भाड्याने घर घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ते वरळी परिसरात भाड्याच्या घराचा शोध घेत होते. याच दरम्यान फेब्रुवारी 2025 रोजी त्यांची तबरेज शेख, इरफान कुरेशी आणि इरफान शेखशी ओळख झाली होती.
या तिघांनी त्यांना वरळीतील लोटस, व्ही. पी नगरातील रिहॅब अपार्टमेंटमध्ये एक घर दाखविले होते. या रुमचा मालक तबरेज शेख असल्याचे त्याला त्याचे घर तीन वर्षांसाठी हेव्ही डिपॉझिटवर द्यायचे आहे असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मालकांना ही माहिती देऊन त्यांना घराची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्याच्या मालकाने तबरेजकडे घराच्या कागदपत्रांच्या मागणी केली, मात्र त्याने त्यांना कागदपत्रे दाखविली, मात्र त्याचे झेरॉक्स प्रत देण्यास नकार दिला. चर्चेअंती त्यांच्यात हेव्ही डिपॉझिट म्हणून साडेसोळा लाख रुपये देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला टप्याटप्याने साडेसोळा लाख रुपये दिले होते.
या पेमेंटनंतर त्यांच्यात त्यांच्यात मार्च 2025 ते मार्च 2028 या कालावधीसाठी तीन वर्षांचा हेव्ही डिपॉझिटचा करारनामा करण्यात आला होता. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने घराचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना पंधराव्या मजल्यावरील दुसरा फ्लॅट दाखवून तोच फ्लॅट त्याला हेव्ही डिपॉझिटवर देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यांनी त्यांचे आश्वासन पाळले नाही. विविध कारण सांगून ते तिघेही त्यांना रुमचा ताबा देण्याचे टाळत होते. त्याच्याकडून घराचा ताबा मिळत नसल्याने त्यांनी घरासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती.
यावेळी तबरेजने ही रक्कम त्याने इरफान शेख आणि इरफान कुरेशी यांना दिल्याचे सांगून त्यांच्याकडेच पैशांची मागणी करण्यास सांगितले. या दोघांकडे पैशांची मागणी केली असता ते दोघेही त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. हेव्ही डिपॉझिटवर रुम देतो असे सांगून या तिघांनी त्यांच्याकडून साडेसोळा लाख रुपये घेतले, मात्र कराराप्रमाणे त्यांना रुमचा ताबा दिला नाही किंवा रुमसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. या पैशांचा परस्पर अपहार करुन या तिघांनी त्यांची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी या तिघांविरुद्ध ताडदेव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची ताडदेव पोलिसांनी गंभीर दखल घेत तिन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच एक महिन्यांपासून फरार असलेल्या तबरेज शेख याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इरफान शेख आणि इरफान कुरेशी यांचाही सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.