मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – आगीत नुकसान झालेल्या हॉटेलच्या नूतनीकरणासाठी घेतलेल्या सुमारे ५० लाखांचा अपहार करुन हॉटेलच्या मॅनेजरची फसवणुक केल्याच्या कटातील दोन मुख्य आरोपींना व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली आहे. प्रद्युमन विरसिंग शिंदे ऊर्फ विवेक मल्होत्रा ऊर्फ विशाल शर्मा आणि प्रकाशचंद समरथमल पुरोहित ऊर्फ प्रविण पटेल अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. अखेर या दोघांनाही अंधेरी आणि मुंबई सेंट्रल येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत विजय नावाच्या एका आरोपीचा सहभाग उघडकीस आला असून त्याच पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मुस्सबीर शौकतअली हे हायवे ब्रेक हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फेब्रुवारी महिन्यांत या हॉटेलला आग लागली होती. या आगीत हॉटेलचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांना हॉटेलचे नूतनीकरण करायचे होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांची त्यांच्या परिचित मोहम्मद खालिद शेख यांनी अशोक चिंदरकर यांच्याशी ओळख करुन दिली होती. त्याने हॉटेल नुतनीकरणासाठी विवेक मल्होत्राची शिफारस केली होती. विवेकने याकामी अधिकृत डिलर प्रविण पटेल हा त्यांच्या हॉटेलचे नूतनीकरण करुन देईल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी प्रविण पटेलची भेट घेऊन त्यांना हॉटेल नूतनीकरणासाठी ५० लाख रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी हॉटेल नूतनीकरणाचे काम सुरु केले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर प्रविण पटेल आणि विवेक मल्होत्रा त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ते प्रविण पटेलच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांना प्रविण हा कार्यालय बंद करुन पळून गेल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी प्रविणकडे विचारणा केली असता त्याने त्यांचे पेमेंट करण्याचे आश्वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत ५० लाख रुपये परत न करता तो पळून गेला होता. त्यामुळे मुस्सबीर शौकतअली यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रविण पटेल आणि विवेक मल्होत्रा या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच विवेक मल्होत्रा याला अंधेरी तर प्रविण पटेल याला मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर सिनेमागृह परिसरातून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. चौकशीत प्रद्युमन शिंदे हा कोल्हाचा रहिवाशी असून सध्या गोरेगाव येथे राहतो तर प्रकाशचंद्र हा राजस्थानचा रहिवाशी असून त्याचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. सध्या मिरारोड येथे एका भाड्याच्या रुमममध्ये राहतो. तक्रारदाराने दिलेल्या ५० लाखांपैकी दहा लाख रुपये प्रद्युमनला, विजयला आठ लाख रुपये तर प्रकाशचंदने स्वतकडे ३२ लाख रुपये ठेवले होते. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.