गृहकर्जाच्या नावाने फसवणुक करणार्या वॉण्टेड आरोपीस अटक
प्रोसेसिंगसह अन्य कामासाठी सव्वाआठ लाख रुपये घेऊन पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – गृहकर्ज देतो असे सांगून प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी घेतलेल्या सुमारे सव्वाआठ लाखांचा अपहार करुन फसवणुक करुन पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. निकेत अंकुश कासारे असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरिवलीतील गोराई परिसरात मिलिंद शांताराम मालुसरे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या वर्षी त्यांनी गोरेगाव येथे एक फ्लॅट पाहिला होता. या फ्लॅट खरेदीसाठी त्यांना गृहकर्जाची गरज होती. त्यांच्या एका मित्राने त्यांना निकेत कासारेशी भेट घडवून आणली होती. तो त्याच्या फ्लॅटसाठी गृहकर्ज मिळवून देईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी निकेशची भेट घेऊन त्याला फ्लॅटबाबत सविस्तर माहिती दिली होती. निकेतने फ्लॅटवर गृहकर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने गृहकर्जासाठी त्याचा फॉर्म भरुन त्याचे वैयक्तिक कागदपत्रे घेतले होते. दोन आठवड्यानंतर त्याने त्याला गृहकर्जासाठी बँक मॅनेजरला काही रक्कम द्यावे लागतील असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्याने त्याला टप्याटप्याने आठ लाख तीस हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने बँकेतून त्याल गृहकर्ज मिळवून दिले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्याला सतत टाळत होता. विविध कारण सांगून आज-उद्या असे उत्तर देऊन त्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे न देता त्याची फसवणुक केली.
हा प्रकार निदर्शनास येताच मिलिंद मालुसरे याने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी निकेश कासारे याच्याविरुद्ध गृहकर्जाच्या नावाने पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच निकेत हा पळून गेला होता. गेल्या दहा महिन्यांपासून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. कर्जाच्या नावाने निकेतने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.