हॉटेल बुकींगसह विमान तिकिटाचा पैशांचा अपहार करुन फसवणुक
सहाजणांची पंधरा लाखांची फसवणुक; एजंटविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – विदेशात जाण्यासाठी हॉटेल बुकींगसह विमान तिकिटासाठी दिलेल्या पंधरा लाखांचा अपहार करुन एका ट्रॅव्हेल्स एजंटने सहाजणांची फसवणुक केल्याचा प्रकार खार परिसरात उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच या सहाजणांनी मोहम्मद शादाब मोहम्मद खालिद फारुखी या एजंटविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पळून गेलेल्या एजंटचा शोध सुरु केला आहे.
विनय शामलाल माखिजा हे खार येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून प्रभादेवीतील ईपी मनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामाला आहेत. त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत फ्रॉन्सला फिरायला जायचे होते. यावेळी दिलावर सिंग नावाच्या त्यांच्या मित्राने त्यांची मोहम्मद शादाबशी ओळख करुन दिली होती. तो त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची पाच दिवसांची फ्लाईट आणि हॉटेल बुकींग करुन देईल असे सांगितले होते. जानेवारी महिन्यांत त्यांनी मोहम्मद शादाबची भेट घेऊन त्याला त्यांच्यासह चौघांची फ्रान्सला जाण्यासाठी विमान तिकिट, हॉटेल बुकींगसह व्हिसासाठी पैसे दिले होते. दोन दिवसांत तिकिट आणून देतो असे सांगून त्याने तिकिट दिली नाही. विविध कारण सांगून तो त्यांना टाळत होता. चौकशीदरम्यान मोहम्मद शादाबने त्यांच्यासह इतर पाचजणांकडून विमान तिकिटासह हॉटेल बुकींग आणि व्हिसासाठी सुमारे पंधरा लाख रुपये घेतल्याचे समजले होते.
मात्र त्यापैकी कोणालाही विमानाचे तिकिट, हॉटेलमध्ये बुकींग करुन दिले नाही. तसेच व्हिसासाठी घेतलेल्या पैशांचा परस्पर अपहार करुन सहाजणांची फसवणुक केली होती. त्यात सुयश त्रिवेदी, सागर बजाज, प्रियांका कालरा, आदित्य अनिलकुमार खन्ना, जयदीप शेठी यांचा समावेश होता. या सर्वांचे विमान तिकिटासह हॉटेल बुकींग केल्याचे सांगून नंतर ते बुकींग रद्द करुन पंधरा लाखांचा अपहार करुन त्याने ही फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच विनय माखिजा यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मोहम्मद शादाबविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.