काजूच्या डिलरशीपसाठी आणलेली तीस लाखांची कॅश पळविली
गोरेगाव येथील घटना; आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ मार्च २०२४
मुंबई, – काजूच्या डिलरशीपसाठी आणलेली सुमारे तीस लाख रुपयांची कॅश घेऊन मित्रानेच पलायन केल्याची घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या मित्राविरुद्ध आरे पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे. सचिन श्रीकांत हिंगणे असे या मित्राचे नाव असून तो मूळचा सांगलीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोल्हापूरच्या इचलकरंजीचे रहिवाशी असलेले स्वप्निल अशोक सिदनाळे यांचा इमारतीसाठी लागणार्या साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे. डिसेंबर २०२३ रोजी ते कामानिमित्त कोल्हापूरच्या बावडा रोड, ताराराणी चौक परिसरात गेले होते. तिथेच त्यांची काजू विक्रेता असलेला सचिन हिंगणेशी ओळख झाली होती. सचिन हा सांगलीच्या शिराळा, बाबंवडे गावचा रहिवाशी होता. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यामुळे त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. याच दरम्यान त्याने त्याच्या व्यवसायाची माहिती देताना काजू विक्रीमध्ये प्रचंड फायदा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या व्यवसायासह या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल असे सांगितले. अनेकदा तो त्यांना व्यवसायासाठी विनंती करत होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी काजू विक्री व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. या व्यवसायासाठी आवश्यक डिलरशीप मुंबईतील एका डिलरकडून मिळवून देतो असे सांगून त्यांना मुंबईत येण्याचा सल्ला दिला होता. काजूच्या डिलरशीपसाठी किमान तीस लाखांची गुंतवणुक करावी लागत असल्याने त्यांनी त्यांचा मित्र संग्रामसिंह छत्रे याच्याकडून १९ लाख तर त्याची पत्नी अमृता छत्रे हिच्याकडून तीन लाख असे २२ लाख रुपये घेतले होते. एक रक्कम त्यांना एक महिन्यांत देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. उर्वरित पैशांसाठी त्यांना त्यांच्या इतर मित्रांनी मदत केली होती.
२३ फेब्रुवारीला ते दोघेही मुंबईत आले होते. गोरेगाव येथे उतरल्यानंतर ते दोघेही सचिनचा नातेवाईक झोडगे याच्याकडे फ्रेश होण्यासाठी गेले होते. काही वेळानंतर ते बँकेत गेले आणि त्यांनी बँकेतून तीस लाख रुपये काढले. त्यानंतर ते दोघेही रिक्षाने आरे कॉलनीजवळ आले होते. यावेळी लघुशंकेसाठी त्यांनी तीस लाख रुपयांची कॅश असलेली बॅग सचिनकडे दिली होती. यावेळी सचिन मोबाईलवर बोलत होता. फोनवर बोलता बोलता तो पुढे निघून गेला आणि दिसेनासे झाला. त्यांनी सचिनचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. डिलरशीपच्या नावाने सचिनने मुंबईत आणून त्यांच्याकडील तीस लाखांची कॅश घेऊन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सचिनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून सचिनचा शोध सुरु केला आहे.