दिडोंशी कोर्टातून पळालेल्या आरोपीचे आर्थर रोड जेलमध्ये आत्मसमर्पण
पोलीस शिपायाच्या हातावर झटका देऊन पळून गेला होता.
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका आरोपीने शुक्रवारी सायंकाळी दिडोंशी सेशन कोर्ट परिसरातून पोलीस शिपायाच्या हातावर जोरात झटका देऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. इब्राहिम साजिद मुजावर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध सुरु असताना रात्री उशिरा इब्राहिमने आर्थर रोड कारागृहात जाऊन आत्महसमर्पण केले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्योन त्याला लवकरच कुरार पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.
निखिल निवृत्ती माने हे मिरारोडच्या काशिगाव परिसरात असून मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नेमणूक ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात आहे. त्यांना बंदोबस्त, आरोपी कोर्ट पेशी, गार्ड तसेच इतर प्रकारची जबाबदारी सोपविली जाते. शुक्रवारी २३ ऑक्टोंबरला त्यांना कोर्ट पेशी नोकरी देण्यात आली होती. त्यामुळे ते आर्थर रोड जेलमध्ये गेले होते. त्यांच्याकडे इब्राहिम मुजावरचा ताबा देण्यात आला होता. त्याला पुढील सुनावणीसाठी दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करायचे होते. इब्राहिम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून गेल्या वर्षी त्याच्याविरुद्ध आंबोली पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती.
तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात ंबंदिस्त आहे. दुपारी साडेबारा वाजता इब्राहिमसह इतर आरोपींना घेऊन पोलीस पथक दिडोंशी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यासाठी निघाले होते. दुपारी दोन वाजता ते सर्वजण कोर्टात आले होते. त्यानंतर निखिल माने हे इब्राहिमला कोर्ट क्रमांक दहामध्ये घेऊन गेले होते. तिथे सुनावणी संपल्यानंतर सायंकाळी त्यांनी इब्राहिमला आर्थर रोड कारागृहात हजर करण्यासाठी ताब्यात घेतले. सरकारी गाडीजवळ आल्यानंतर इब्राहिमला दोन महिला भेटल्या. त्या त्याच्या कुटुंबियातील सदस्य असल्याचे समजून त्यांनी त्याच्याशी बोलण्याची परवानगी दिली होती.
सायंकाळी चार वाजता गाडीजवळ नेत असताना इब्राहिमने त्यांच्या हाताला जोरात धक्का देऊन तेथून पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच निखिल माने यांच्यासह इतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो सुसाट वेगाने पळून गेला होता. या घटनेनंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुम, ताडदेव येथील सशस्त्र विभाग, संरक्षण कार्यालयात ही माहिती सांगितली होती. त्यानंतर ते कुरार पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी इब्राहिम मुजावरविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रात्री तो आर्थर रोड कारागृहात आला आणि त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याला ताब्यात घेऊन पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. ही माहिती नंतर आंबोली आणि कुरार पोलिसांना देण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याचा लवकरच कुरार पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून बोरिवलीतील लोकल कोर्टात अर्ज केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.