सिनेअभिनेता टायगर श्रॉफ गोळीप्रकरणी अन्य एका आरोपीस अटक
गुन्ह्यांतील पिस्तूलसह जिवंत काडतुसे सुरत येथून जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी अन्य एका आरोपीस इंदोर येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले जात असून या गुन्ह्यांत अटक झालेला तो अकरावा आरोपी आहे. २३ वर्षांचा आरोपी प्रांजल ठाकरान हा मूळचा हरियाणाच्या सोनीपतचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान गोळीबारात वापरण्यात आलेले पिस्तूल आणि जिवंत काडतुसे पोलिसांनी सुरत येथून जप्त केले आहेत. मुंबईतून पळून गेल्यानंतर तिन्ही शूटरने शस्त्रे सुरत येथून टाकून पलायन केले होते.
टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर या कटातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम होती. ही मोहीम सुरु असताना दिल्ली, कोटा रेल्वे स्थानक आणि सोनीपत येथून एकूण दहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश असून याच दोन महिलांनी तिन्ही शूटरला गोळीबारासाठी शस्त्रे आणून दिल्याचा आरोप आहे. सर्व दहाही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून मिळत असलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गुन्ह्यांत भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली हाोती. त्यात प्रांजल ठाकरान याचे नावे समोर आले होते.
प्रांजल हा हरियाणाचा सोनीपतचा रहिवाशी आहे. तो सध्या इंदौर येथे वास्तव्यास असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने इंदौर येथून प्रांजलला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याला ट्रॉन्झिंट रिमांड घेऊन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे. रविवारी त्याला किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. प्रांजलच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे.
दुसरीकडे गुन्हे शाखेचे एक पथक सुरतला पाठविण्यात आले होते. या पथकाने गोळीबारासाठी वापरण्यात आलेले दोन पिस्तूल आणि दहा जिवंत काडतुसे सुरत येथून जप्त केले आहेत. गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेल्यानंतर तिन्ही शूटर काही तासांसाठी सुरत येथे थांबले होते. तिथे त्यांनी शस्त्रांची विल्हेवाट लावली होती. त्यांच्या चौकशीतून संबंधित ठिकाणाची माहिती प्राप्त होताच या पथकाने दोन्ही पिस्तूलसह काडतुसे जप्त केले आहेत. ते शस्त्रे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. जेणेकरुन त्यांचा ताळमेळ घटनास्थळावरुन मिळालेल्या रिकाम्या पुंगळ्यांशी बसविता येणार आहे. शस्त्रे पुरवठा साखळीतील इतर आरोपींची नावे समोर आल्याने त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.