प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात फ्लॅटच्या नावाने फसवणुक
जयेश तन्नाला अन्य एका गुन्ह्यांत अटक तर दोघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका ५९ वर्षांच्या महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी व्हाईट कॉलर गुन्हेगार बिल्डर जयेश विनोदकुमार तन्ना याला अन्य एका गुन्ह्यांत डी. एन नगर पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यांत हिना तन्ना आणि दिप तन्ना हे सहआरोपी असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. जयेश तन्नाने आतापर्यंत अनेकांना फ्लॅटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यासह आर्थिक गुन्हे शाखेत अनेक अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयश्री मनीलाल शहा ही महिला सांताक्रुज येथे राहत असून ती कायदेशीर सल्लागार म्हणून काम करते. तिचे वडिल मनीलाल शहा यांची जयेशसोबत जुनी ओळख होती. २००७ साली त्यांना एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. यावेळी साई सिद्धांत डेव्हल्पर्सचे मालक जयेश तन्नाने तिला त्याच्या प्रोजेक्टमध्ये पैशांची गरज असल्याचे सांगून कॅश स्वरुपात गुंतवणुक केल्यास तिला फ्लॅटममध्ये मोठ्या प्रमाणात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळेस जयेशचे अंधेरीतील डी. एन नगर वसाहतीत अनेक पुर्नविकास इमारतीचे प्रोजेक्ट सुरु होते. यातील एका इमारतीमध्ये तो तिला फ्लॅट देणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला कॅश स्वरुपात ५१ लाख १८ हजार ७५० रुपये दिले होते. पेमेंट मिळाल्याने त्याने तिला त्याच्या कंपनीच्या लेटरहेडवर पत्र दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिला फ्लॅट दिले नाही. तिने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर जयेशसह हिना आणि दिप तन्नाने तिला पोलिसांत गेली तर तुला फ्लॅट आणि पैसे दोन्ही मिळणार नाही तसेच तिला बघून घेण्याची धमकी दिली होती. अनेकदा त्याच्या कार्यालयात गेल्यानंतर तो तिला गेल्यानंतर शिवीगाळ करत होता. तिचे पैसे अडकले असल्यो तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नव्हती.
जुलै २०२१ रोजी तिने दिडोंशी सत्र न्यायालयाने जयेशसह इतर आरोपीविरुद्ध एक सिव्हील सूट दाखल केली होती. त्याची सुनावणी अद्याप सुरु आहे. फ्लॅटचे अलोटमेंट देताना जयेशने तिला बोगस दस्तावेज बनवून दिले होते. ते दस्तावेज देऊन त्याने तिच्याकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे ५१ लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे तिने डी. एन नगर पोलिसांत संबंधित सर्व आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मार्च २०२४ रोजी जयेश तन्ना, हिना तन्ना, दिप तन्ना या तिघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून महिलेच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत जयेशला अलीकडेच पोलिसांनी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.