बिल्डर जयेश तन्नाला अन्य एका गुन्ह्यांत अटक

व्यावसायिक गाळ्यांसाठी घेतलेल्या तीन कोटीचा अपहार केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – अंधेरीतील एका इमारतीमध्ये व्यावसायिक गाळ्यांसाठी घेतलेल्या तीन कोटीचा अपहार करुन एका व्यावसायिकाची सुमारे तीन कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी साई-सिद्धी डेव्हलपर्स एस्कटाईस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि बिल्डर जयेश विनोदकुमार तन्ना याला आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शुक्रवार ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत कंपनीच्या इतर चार संचालकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात दिप विनोद तन्ना, विवेक जयेश तन्ना, श्रद्धा जयेश तन्ना, हनीता विवेक तन्ना यांचा समावेश आहे. या चौघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

५१ वर्षांचे तक्रारदार विनोद नरेनदास पंजाबी हे व्यावसायिक असून ते त्यांच्या अंधेरीतील न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉलजवळील रेहजा क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहतात. जून २०१४ रोजी त्यांची जयेश तन्ना याच्याशी ओळख झाली होती. यावेळी जयेशने त्यांना त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये स्वस्तात गाळा देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये तीन व्यावसायिक गाळे बुक केले होते. त्यासाठी तन्ना यांच्या कंपनीला तीन कोटी रुपयांचे पेमेंट केले होते. त्यापैकी २ कोटी ३७ लाख ७२ हजार चेक तर ६८ लाख ४२ हजार कॅश स्वरुपात देण्यात आले होते. या पेमेंटनंतर जयेशने त्यांच्यासोबत तिन्ही व्यावसायिक गाळ्याचा खरेदी-विक्रीचा करार केला होता. त्यापैकी दोन गाळ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. मात्र वारंवार सांगूनही त्यांनी तिसर्‍या गाळ्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. दुसरीकडे प्रोजेक्टमध्ये दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना व्यावसायिक गाळ्यांचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर या सर्व संचालकांनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. जून २०१४ ते एप्रिल २०२४ या कालावधीत तीन गाळ्यासाठी दिलेल्या सुमारे तीन कोटीचा अपहार करुन जयेशसह इतर संचालकांनी त्यांची फसवणुक केली होती.

याच दरम्यान त्यांना जयेश तन्नाने अशाच प्रकारे अनेकांना फ्लॅटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी आंबोली पोलिसांत संबंधित संचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयेश तन्ना, दिप तन्ना, विवेक तन्ना, श्रद्धा तन्ना आणि हनीता तन्ना या पाचही संचालकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत रविवारी जयेश तन्नाला आंबोली पोलिसांनी अटक केली. जयेश हा रेकॉर्डवरील व्हाईट कॉलर गुन्हेगार आहे. गेल्या काही वर्षांत जयेश तन्नासह त्याच्या इतर नातेवाईकांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचे २५ हून अधिक गुन्ह्यांची नोंद असून या गुन्ह्यांत तन्ना कुटुंबियांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश गुन्ह्यांत जयेश तन्नाला पोलिसांनी अटक झाली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता. त्यामुळे त्याचा आंबोली पोलिसांनी कोर्टात अर्ज करुन ताबा घेतला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page