मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – अनैतिक संबंधातून विवाहीत प्रेयसीच्या वडिलांवर प्रियकराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. या हल्ल्यात मरियप्पन राजा देवेंद्र (४२) हे जखमी झाले होते. याप्रकरणी जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी कथित प्रियकर कृष्णा माडास्वामी देवेंद्र (२६) याला अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मरियप्पन देवेंद्र हे विलेपार्ले येथील व्ही. एम रोड क्रमांक पाच, नेहरुनगर, सिद्धीविनायक चाळीत राहत असून ते मिस्त्रीचे काम करतात. याच परिसरात त्यांची विवाहीत मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले आहे.तिचा पती बाहेरगावी नोकरीनिमित्त असल्याने ती सध्या ती एकटीच राहते. मंगळवारी रात्री उशिरा एक वाजता मरियप्पन हे त्यांच्या मुलीच्या घरी नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. यावेळी तिच्या मुलीसोबत तिथे आरोपी कृष्णा होता. त्याला पाहिल्यानंतर त्यांनी तिला तो तिथे काय करतो अशी विचारणा केली होती. यावेळी त्याने त्याच्या मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध आहे. आमच्या प्रेमसंबंधास अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. इतकेच नव्हे त्याने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
आमच्या प्रेमात कोणी आल्यास त्यांना कायमचा संपवू टाकण्याची धमकी देत त्याने त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यातून रागाच्या भरात त्याने त्यांच्यावर हातोड्याने प्राणघातक हल्ला केला होात. त्यात त्यांच्या हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. अचानक झालेल्या आरडाओरडानंतर तिथे स्थानिक रहिवाशी जमा झाले होते. यावेळी हल्ल्यात जखमी झालेल्या मरियप्पन यांना लोकांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी मरियप्पन देवेंद्र यांच्या जबानीनंतर पोलिसांनी आरोपी कृष्णा देवेंद्र याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात कृष्णा हा नेहरुनगर, देवेंद्र चाळीत राहत असून काहीच कामधंदा करत नाही. त्याचे मरियप्पन यांच्या मुलीसोबत अनैतिक संबंध होते. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी ते घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार समजला होता. त्यातून झालेल्या वादातून कृष्णाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.