हिरे व्यापार्याकडे चोरी करणार्या केअरटेकरला अटक
पंधरा लाखांचे हिरेजडीत दागिने घेऊन पलायन केले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – विलेपार्ले येथे राहणार्या एका हिरे व्यापार्याच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या केअरटेकरला अटक करण्यात जुहू पोलिसांना यश आले. झिशान फैजुल हसन अन्सारी असे या आरोपी केअरटेकरचे नाव असून त्याने अलीकडेच व्यापार्याच्या घरातून सुमारे पंधरा लाखांचे हिरेजडीत दागिन्यांसह इतर मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विकी मफतलाल शहा (४४) हे हिरे व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियासोबत विलेपार्ले येथील एन. एस रोड, जेव्हीपीडी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची अरिश जेम्स नावाची हिरे व्यापार्याशी संबंधित कंपनी आहे. त्यांच्या घरी पाच नोकर असून त्यात झिशान याचा समावेश होता. तो मूळचा उत्तरप्रदेशच्या मावू, भंजनचा रहिवाशी आहे. तो त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिलांचा केअरटेकर म्हणून काम करत होता. त्यांच्या देखभाल करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. २६ नोव्हेंबरला झिशान हा गावी जातो असे सांगून त्यांच्या निघून गेला होता. गावी महत्त्वाचे काम असल्याने त्यांनीही त्याला गावी जाण्याची परवानगी दिली होती.
१२ डिसेंबरला ते त्यांच्या वडिलांच्या रुममधील कपाटाची पाहणी करत होते. यावेळी त्यांना काही हिरेजडीत सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सर्व दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात त्यांना एक लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने, सहा लाखांची हिर्याची अंगठी, सहा लाख ऐंशी लाखांची चार सोनसाखळी, पंधरा हजाराची कॅश आणि एक लाखांचे विविध कंपनीचे घड्याळ असा सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांसह सर्व पाचही नोकरांना विचारणा केली होती. यावेळी त्यांनी दागिन्यांबाबत त्यांना काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी झिशानला कॉल केला असता त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
ही चोरी त्यानेच केल्याचा संशय व्यक्त करुन विकी शहा यांनी जुहू पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी केअरटेकर झिशानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच पळून गेलेल्या झिशानला गुरुवारी जुहू पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.