ब्रेकअप करणार्या प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या
भरस्त्यात व दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने तणावाचे वातावरण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एक आठवड्यापूर्वी प्रेमसंबंधाचा ब्रेकअप करणार्या प्रेयसीची तिच्याच प्रियकराने तिक्ष्ण हत्याराने वार करुन नंतर स्वत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी काळाचौकी परिसरात घडली. मनिषा यादव असे या तरुणीचे नाव असून तिच्या प्रियकराचे नाव सोनू बरई असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सोनूविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. भरस्त्यात व दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना शुक्रवारी 24 ऑक्टोंबरला सकाळी अकरा वाजता काळाचौकी येथील दिग्विजय मिलजवळील, दत्ताराम लाड माार्गावर घडली. 24 वर्षांचा सोनू हा बेरोजगार असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत काळाचौकी येथील आंबेवाडी परिसरात राहत होता. याच परिसरात मनिषा यादव हीदेखील तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. एकाच परिसरात राहत असल्याने ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते दोघेही प्रेमसंबंधात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सतत क्षुल्लक कारणावरुन खटके उडत होते. त्यातून तिने एक आठवड्यापूर्वीच त्याच्याशी ब्रेकअप घेतला होता. तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकले होते, त्याच्याशी ती बोलत नव्हती, त्याचे कॉल घेत नव्हती.
ब्रेकअपमागे मनिषाचे दुसर्या तरुणाशी प्रेमसंंबंध असल्याचा त्याला संशय होता. त्याचा सोनूला प्रचंड राग आला होता. त्यामुळे त्याने तिला शेवटचे भेटायचे आहे असे सांगून बोलाविले होते. सकाळी अकरा वाजता ते दोघेही त्यांच्यातील नात्याबाबत बोलणीसाठी भेटले होते. यावेळी त्याने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ब्रेकअपवर मनिषा ही ठाम होती. तिने त्याला त्याच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाही असे निक्षून सांगितले होते. यावेळी रागाच्या भरात सोनूने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली होती. त्यात ती रक्तबंबाळ झाली होती. त्यामुळे मनिषा ही जवळच्या आस्था मॅटरनिटी अॅण्ड सर्जिकल नर्सिंग होममध्ये जीव वाचविण्यासाठी गेली होती,
सोनू तिच्या मागे तिथेही आला. त्याने तिच्यावर पुन्हा तिक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर त्याने त्याच तिक्ष्ण हत्याराने स्वतच्या गळ्यावर वार केले होते. हा संपूर्ण प्रकार काही लोकांच्या समोर घडला होता. काही लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याने सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यासह काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या सोनू आणि शमनिषा या दोघांनाही जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तिथे सोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर आयसीयूमध्ये उपचार सुरु असलेल्या मनिषाचा सायंकाळी पाच वाजता उपचारादरम्यानच मृत्यू झाला होता. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी हत्येसह आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या कुटुंबियांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर या घटनेमागील कारणाचा अधिकृत खुलासा होणार आहे. या घटनेमागे ब्रेकअपशिवाय अन्य काही कारण आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान दिवसाढवळ्या आणि भरस्त्यात घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वरिष्ठांकडून वाहतूक पोलीस शिपाई करण सूर्यवंशी यांचे कौतुक
सकाळी सव्वादहा वाजता दत्ताराम लाड मार्ग, मयुरेश इमारतीसमोरील फुटपाथवर वाहने पार्क केल्याने स्थानिक रहिवाशांनी वाहतूक पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलीस शिपाई किरण सूर्यवंशी तिथे रवाना झाले होते. यावेळी त्यांना या घटनेची माहिती समजली होती. त्यामुळे किरण सूर्यवंशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी त्याने सोनूला मनिषापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. तिला नर्सिग होममधून बाहेर काढले आणि टॅक्सीने तिला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने मनिषाला नंतर जे. जे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. हल्लेखोर सोनू याने स्वतवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यामुळे त्यालाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. घडलेली घटना वाईट असली तरी आपल्या जिवाची पर्वा न करता किरण सूर्यवंशी यांनी दाखविलेल्या शौर्याबाबत पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्यासह अन्य पोलीस अधिकार्यांनी कौतुक केले होते.
