कांदिवली-मालाड येथील अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू
बांगुरनगर-कांदिवली पोलीस ठाणयात दोन स्वतंत्र एडीआरची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कांदिवली आणि मालाड येथील दोन अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. हर्षा हिरेन कोठारी आणि करंतु गुमानी यादव अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी बांगुरनगर आणि कांदिवली पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली आहे. एका अपघाताला करंतु हाच जबाबदार असल्याचे उघडकीस आले असून दुसर्या अपघातातील मिक्सर ट्रकचालक कमलेशकुमार श्रीमदन यादव याला बांगुरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
पहिला अपघात शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता मालाड येथील लिंक रोड, इनॉरबीट मॉल सिग्नलजवळ झाला. हिरेन महेंद्र कोठारी हे बोरिवली परिसरात राहत असून सायन येथील मोहनलाल अॅण्ड ब्रदर्स कंपनीत कंपनीत कामाला होते. जानेवारी महिन्यांत त्यांनी ती नोकरी सोडून दिली होती. मृत हर्षा ही त्यांची पत्नी असून ती तिच्या राहत्या घरी ब्युटीपार्लरचे क्लास घेत होती. शनिवारी सकाळी पावणेदहा वाजता हिरेन हे त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नैती यांच्यासोबत होंडा अॅक्टिव्हा बाईक्नुन इनॉरबीट मॉलजवळ खरेदीसाठी आले होते.
सिग्नलवरुन उजवीकडे जाताा एका सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यामुळे हर्षा ही बाईकवरुन खाली पडली होती, याच दरम्यान ट्रकच्या चाकाखाली आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तातडीने शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी चालक कमलेशकुमार श्रीमदन यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने मिक्सर ट्रक चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दुसरा अपघात पहाटे चार वाजता कांदिवलीतील एस. व्ही रोड, पोयसरकडून मालाडकडे जाणार्या शताब्दी हॉस्पिटलसमोरील वाहिनीवर झाला. शुक्रवारी रात्री उशिरा कांदिवली पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. पहाटे चार वाजता शताब्दी हॉस्पिटलसमोर अपघात झाल्याचा कॉल प्राप्त होताच संबंधित पोलीस पथक तिथे गेले होते. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी जखमी झालेल्या जखमी झालेल्या व्यक्तीला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तपासात मृत व्यक्तीचे नाव करंतु यादव असून तो अंधेरीतील गणपती मंदिर, असल्फा मेट्रो स्टेशनजवळ राहतो. पहाटे चार वाजता करंतु हा त्याच्या बाईकवरुन जात होता. यावेळी स्पिड ब्रेकरचा अंदाज न आल्याने तो बाईक्वरुन पडला. यावेळी समोरुन येणार्या डंपरच्या चाकाखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. मात्र डंपरचालकाने त्याला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पलायन केले होते. सीसीटिव्ही फुटेजवरुन हा प्रकार दिसून आला होता.
या अपघाताला करंतु यादव हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणात पळून गेलेल्या डंपरचालक मोहम्मद अकील अली हसन याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची नंतर जबानी नोंदविण्यात आली होती.