कौटुंबिक वादातून होणार्‍या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा तर पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 नोव्हेंबर 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून हाजिरा खातून मोहम्मद इम्तियाज खान या 23 वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हाजिरा खातूनचा पती मोहम्मद इम्तियाज मोहम्मद हलीम खान, नणंद सबाना खान आणि सासरे मोहम्मद हलीम मोहम्मद बशीर खान या तिघांविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषन करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी पती मोहम्मद इम्तियाजला घाटकोपर पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी दुजोरा दिला आहे.

गुलाम मोहम्मद हनीफ मोहम्मद रसुल शेख हे 45 वर्षांचे तक्रारदार उत्तरप्रदेशच्या तुलसीपूर, बलरामचे रहिवाशी असून तिथे मजुरीचे काम करतात. त्यांची हाजिरा ही बहिण असून तिचे डिसेंबर 2023 रोजी मोहम्मद इम्तियाजशी झाला होता. तो घाटकोपर येथील मिलिंदनगर, हिमालय सोसायटीच्या सिद्धार्थ मित्र मंडळात राहत होता. विवाहानंतर हाजिरा ही तिच्या सासरी आली होती. तिच्यासोबत तिचे सासरे मोहम्मद हलीम, सासू कमरुन्नीसा राहत होते. तिचे पती हेल्पर म्हणून कामाला होते. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरु होता.

मात्र लग्नाच्या चार महिन्यानंतर क्षुल्लक कौटुंबिक वादातून हाजिरा आणि मोहम्मद इम्तियाज यांच्यात खटके उडू लागले होते. तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. याबाबत तिने तिचा भाऊ गुलाम मोहम्मदला सांगितले होते, त्याने तिला कुटुंबात अशा प्रकारे लहानसहान वाद होत असल्याचे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यातील वाद संपत नसल्याने तो तिला घेऊन उत्तरप्रदेशातील गावी घेऊन आला होता. बाळंततपणानंतर एक वर्षांनी त्याने तिला पुन्हा घाटकोपर येथील सासरी सोडले होते. त्यानंतर तिचा पती मोहम्मद इम्तियाज, सासरे मोहम्मद हलीम आणि नणंद सबाना ही तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. तिने माहेरहून पैसे आणावेत म्हणून तिची त्यांच्याकडून मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता.

बुधवारी 29 ऑक्टोंबरला गुलाम मोहम्मद हा त्याच्या कुटुंबियांसोबत गुजरातच्या वापी येथे आला होता. दुपारी अडीच वाजता त्याला मोहम्मद इम्तियाजने कॉल करुन हाजिराने विषारी औषध प्राशन केले असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. तिची प्रकृती गंभीर असून तिला व्हेंटीलिटर ठेवण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे गुलाम मोहम्मद त्याच्या कुटुंबियांसोबत मुंबईत आला होता. त्यानंतर ते सर्वजण सायन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना हाजिराचा उपचारादरम्यान रात्री सव्वाआठ वाजता मृत्यू झाल्याचे समजले. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी गुलाम मोहम्मदची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत त्याने त्याची बहिण हाजिरा हिच्या मृत्यूस तिच्या पतीसह सासरे आणि नणंद यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. पैशांसाठी या तिघांनी तिचा मानसिक व शारीरिक शोषण केला होता. या शोषणाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याचे जबानीत म्हटले होते. त्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पतीसह सासरे आणि नणंद अशा तिघांविरुद्ध हाजिराला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच मोहम्मद इम्तियाज खान याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत आरोपी सासरे मोहम्मद हलीम आणि नणंद सबाना खान हिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page