एक कोटीच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल
सात वर्ष उलटूनही गाळ्याचा ताबा किंवा पैसे न देता फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – व्यावसायिक गाळ्यासाठी एक कोटीची फसवणुक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनिल गोगिया असे या बिल्डरचे नाव असून त्याच्यावर सात वर्ष उलटूनही व्यावसायिक गाळ्याचा ताबा न देता तसेच गाळ्यासाठी घेतलेले परत न करता एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर त्याने त्यांच्यासह इतर लोकांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याचे बोलले जात आहे. अटकेच्या कारवाईनंतर सुनिलने आतापर्यंत किती लोकांची फसवणुक केली आहे याचा उलघडा होणार आहे. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनिष कन्हैयालाल हेमदेव हे व्यावसायिक असून ते अंधेरीतील चार बंगला, म्हाडा परिसरात राहतात. सात वर्षांपूर्वी सुनिल गोगियाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची पहिली भेट त्याच्या खार येथील चवथा रोड, विनायक चेंबर्समधील राहत्या घरी झाली होती. त्याची विनायक बिल्डर्स ऍण्ड डेव्हल्पर्स नावाची एक कंपनी असून याच कंपनीचा सुनिल हा मालक आहे. त्याच्या कंपनीने खार येथील एका इमारतीचे बांधकाम सुरु केले होते. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर त्यांनी एक व्यावसायिक गाळा खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी सुनिलला एक कोटीचे पेमेंट केले होते. मात्र पेमेंट करुनही त्याने त्यांच्यासोबत कुठलाही करार केला नाही. सात वर्ष उलटूनही त्याने व्यावसायिक गाळ्याचा ताबा दिला नाही. त्यांनी बुक केलेल्या गाळयाची त्याने परस्पर दुसर्या व्यक्तीला विक्री केली होती. ही माहिती समजताच त्यांनी गाळ्यासाठी दिलेल्या एक कोटीची मागणी सुरु केली होती. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना पैसे परत केले नाही.
याच दरम्यान मनिष हेमदेव यांना सुनिल गोगियाने त्यांच्यासह इतर काही लोकांकडून व्यावसायिक गाळ्यासाठी लाखो रुपयांचे पेमेंट घेतल्याचे समजले होते. मात्र त्यापैकी कोणालाही व्यावसायिक गाळ्याचा ताबा दिला नाही. त्यांच्याश गाळ्याचा कुठलाही करार केला नव्हता. त्यांच्यासह इतराकडून घेतलेल्या पैशांचा वापर त्याने त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी गेला. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर त्याने परस्पर त्यांच्या गाळ्याची विक्री करुन तक्रारदार व्यावसायिकासह इतरांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सुनिल गोगियाविरुद्ध खार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून सुनिलची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.