जेवणातून गुंगीचे औषध देऊन अडीच कोटीच्या हिरेजडीत दागिन्यांची चोरी
बिहारला पळून गेलेल्या दोन्ही नोकरांना चोरीच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – जेवणातून गुंगीचे औषध देऊन एका व्यावसायिक महिलेच्या घरातून सुमारे अडीच कोटीचे हिरेजडीत तसेच सोन्याचे दागिने चोरी करुन बिहारला पळून गेलेल्या दोन्ही नोकरांना खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. राजा ऊर्फ निरज यादव आणि शत्रुघ्न ऊर्फ राजू कुमार अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुनिता विजय झव्हेरी ही महिला तिची मुलगी अनायासोबत खार येथील चौदावा रोड, झव्हेरी हाऊसमध्ये राहते. तिचे पती ज्वेलर्स व्यापारी होते. त्यांच्या निधनानंतर ती त्यांच्या व्यवसाय सांभाळत होती. तिच्या राहत्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर तिचा ज्वेलरी बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे संतोष रॉय हा चालक म्हणून कामाला होता. मात्र पतीच्या निधनानंतर संतोष नोकरी सोडून गेला होता. त्याच्या ओळखीतून त्याने निरज आणि राजू यांना त्यांच्याकडे घरकामासाठी ठेवले होते. दिवसभर काम करुन ते दोघेही पहिल्या मजल्यावरील किचनमध्ये झोपत होते. पतीच्या निधनानंतर तिने तिच्यासह मुलीसाठी एका महिलेस केअरटेकर म्हणून नोकरीस ठेवले होते. ती त्यांच्यासोबत राहत होती. गेल्या आठवड्यात तिची वयोवृद्ध नणंद प्रज्ञा झव्हेरी ही पुण्यातून त्यांच्याकडे राहण्यासाठी आली होती.
१० फेब्रुवारी त्यांचा स्वयंपाकी निरज सिंग हा त्यांना नास्ता बनवून त्याच्या घरी निघून गेला. काही वेळानंतर राजू आणि निरज यांनी त्यांना नास्ता दिला. नास्ता खाल्यानंतर त्यांना मळमळ होऊ लागली. प्रकृती बिघडल्यामुळे सुनिता, तिची मुलगी अनाया आणि नणंद प्रज्ञा हे आराम करण्यासाठी बेडरुममध्ये झोपून गेले. दुसर्या दिवशी आठ वाजता त्यांना जाग आली. यावेळी त्या सर्वांना उलट्या होऊ लागल्या. घराची पाहणी केल्यानंतर त्यांना सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तिजोरीतील कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यातील सुमारे अडीच कोटीचे सोन्याचे हिरेजडीत तसेच सोन्याचेदागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. या चोरीनंतर तिच्या घरातील दोन्ही नोकर निरज आणि राजू घरातून पळून गेले होते. त्यांचा मोबाईल बंद येत होता. या दोघांनी नास्तातून गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करुन तिजोरीतील सुमारे अडीच कोटी रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तिने तिच्या बहिणीचा मुलगा सिद्धार्थ रावलला ही माहिती दिली. घरी आल्यानंतर त्याने त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना सिद्धार्थ रावलने ही माहिती खार पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सुनिता झव्हेरी यांच्या तक्रारीवरुन खार पोलिसांनी राजू आणि निरज या दोन्ही नोकराविरुद्ध ३२८, ३८१, ३४ भादवी कलमांतगर्र्त गुन्हा नोंदविला होता. या घटनेची पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दडिया, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप खुडे यांनी गंभीर दखल घेत खार पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक दिपशिखा वारे, कणसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, कुंभारे, प्रदीप पाटील, देवीदास पडलवार, मोरे, धापटे, पोलीस हवालदार काच्चे, शिर्के, पोलीस शिपाई तोरणे, घाटकर, गणेश हंचनाळे यांनी तपासाला सुरुवात करुन आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर घटनेच्या वेळेस राजू आणि निरज हे घाईघाईने घरातून पळून जात असल्याचे उघडकीस आले.
ते दोघेही मूळचे बिहारचे रहिवाशी होते. चोरीनंतर ते दोघेही बिहारला पळून गेल्याची शक्यता होती. त्यामुळे खार पोलिसांचे एक विशेष पथक बिहारला पाठविण्यात आले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिहारच्या हाथोडी येथून निरज ऊर्फ राजा यादव आणि राजू ऊर्फ शत्रुध्न कुमार या दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही ट्रॉन्झिंट रिमांडवर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. सोमवारी त्यांना वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याकामी त्यांना अन्य कोणी मदत केली होती का याचा पोलीस तपास करत आहे.