२५ वर्षांच्या मनोरुग्ण तरुणीवर लैगिंक अत्याचार

कुर्ला येथील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ जुलै २०२४
मुंबई, – मनोरुग्ण असलेल्या एका २५ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच परिचित आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना कुर्ला परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वयोवृद्ध आईच्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी रशीद मोहम्मद मुन्ना मंसुरी या ३० वर्षांच्या तरुणाविरुद्ध लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पळून गेल्याने त्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

६५ वर्षांची वयोवृद्ध महिला कुर्ला येथे राहत असून तिला २७ वर्षाची एक मुलगी आहे. ती मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे. तिच्यावर सात वर्षांपासून जे. जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ती उजव्या पायाने अपंग असून लंगडत चालते. याच परिसरात रशीद मंसुरी याचे एक दुकान असून गेल्या पाच वर्षांपासून तो तिथे व्यवसाय करतो. त्यामुळे तो त्यांच्या परिचित होता. अनेकदा त्याला कामाची गरज असल्यास तो तिच्या मुलीची मदत घेत होता. रविवारी ती तिच्या मुलीसोबत घरी होती. यावेळी तिला रशीदने कॉल करुन तिच्या मुलीला खिचडा घेऊन जाण्यासाठी दुकानात पाठव असे सांगितले. त्यामुळे तिची मुलगी त्याच्या दुकानात गेली होती. सायंकाळी पावणेसात वाजता ती घरी आली. यावेळी तिच्या कपड्यांना रक्ताचे डाग होते. याबाबत तिला विचारणा केल्यानंतर तिने रशीदने दुकानात गेल्यानंतर तिचे कपडे काढून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे सांगितले. तिला मासिक पाळी सुरु झाल्याने रक्ताचे डाग लागल्याचे सांगून हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे त्याने तिला सांगितले होते.

ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती रशीदच्या दुकानात गेली होती. यावेळी रशीद हा दुकानातील फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिला पाहिल्यानंतर तो तेथून पळून गेला. काही वेळानंतर तो तिच्या घरी आला आणि त्याने तिच्या मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करु नये म्हणून त्याने तिला पाच हजार रुपये देण्याची ऑफर दिली. तिने पैसे घेण्यास नकार देत ही माहिती तिच्या भावासह मुलाला सांगितली. त्यानंतर ते सर्वजण कुर्ला पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. याप्रकणी वयोवृद्ध तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रशीद मंसुरीविरुद्ध ६४ (२), (के), ६४ (२), ६४ (२) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. रशीद हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page