कर्जाच्या वसुलीसाठी मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी

खाजगी ऍपवर फोटोसह वैयक्तिक माहिती देणे महागात पडले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कर्जाच्या वसलीसाठी मॉर्फ केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका नामांकित हॉस्पिटलमध्ये सहाय्यक आरोग्य अधिक्षक पदावर काम करणार्‍या महिलेकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भान्यासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. कर्जासाठी एका खाजगी ऍपवर स्वतचा फोटोसह वैयक्तिक माहिती अपलोड करणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

३७ वर्षांची तक्रारदार महिला ही घाटकोपरच्या शासकीय वसाहतीत राहत असून दक्षिण मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये सहाय्यक अधिक्षक पदावर काम करते. २७ ऑगस्टा गोपाळकाला असल्याने ती तिच्या घरी होती. सोशल मिडीयावर व्हिडीओ आणि पोस्ट पाह असताना तिला एम पॉकेट नावाचे झटपट लोन मिळण्यासंदर्भातील एक माहिती दिसली होती. तिला पैशांची गरज होती, त्यमुळे तिने एम पॉकेट ऍप डाऊनलोड करुन तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती आणि फोटो अपलोड केले होते. या माहितीनंतर १ सप्टेंबरला तिच्या बँक खात्यात ३ हजार ६०० रुपये जमा झाले होते. त्यानंतर सहा दिवसांनी तिला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. यावेळी त्याने त्याच्या ऍपवरुन तिने कर्ज घेतले आहे. ही रक्कम व्याजासहीत परत करा असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला तीन हजार रुपये परत केले होते. रात्री उशिरा संबंधित व्यक्तीने तिला तिचा चेहरा असलेला मॉर्फ न्यूड फोटो पाठविण्यात आला होता. त्यात त्याने तिने कर्जाची परतफेड केली नाहीतर तिचे मॉर्फ न्यूड फोटो तिच्या परिचित व्यक्तींना पाठवून तिची बदनामीची धमकी दिली होती. त्यानंतर तिला पैशांसाठी ब्लॅकमेल करुन सतत धमकी देत होता. या धमकीनंतर तिने माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्या तक्रार अर्जावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३०८ (३) भारतीय न्याय सहिता सहकलम ६५, ६७, ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page