ओव्हरटेक करण्याचा जाब विचारला म्हणून तरुणाची हत्या

हत्येप्रकरणी रिक्षाचालकासह सहाजणांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – ओव्हरटेक करण्याचा जाब विचारला म्हणून एका ट्रॅव्हेल्स व्यवसायिक तरुणाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना शनिवारी मालाड परिसरात उघडकीस आली. आकाश दत्तात्रय माईन असे हत्या झालेल्या ३४ वर्षांच्या व्यावसायिकाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह सहाजणांना दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश नामदेव कदम, अमीत जोगिंदर विश्‍वकर्मा, आदित्य दिनेश सिंग, जयप्रकाश दिपक आमटे, राकेश मलकू ढगळे आणि साहिल सिंकदर कदम अशी या सहाजणांची नावे आहेत. या गुन्ह्यांत वैभव विश्‍वास सावंत याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शनिवारी १२ ऑक्टोंबरला सायंकाळी सहा वाजता मालाड येथील शिवाजी चौक, दप्तरी रोड, अभ्युदय बॅकेसमोर घडली. आकाश माईन हा हैद्राबाद येथे त्याच्या पत्नीसोबत राहतो तर त्याची आई-वडिल मालाड येथील दत्त मंदिर रोड, पंचगंगा इमारतीमध्ये राहतात. त्याचा तिथे अजिंक्य टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय आहेत. गुरुवारी १० ऑक्टोंबरला तो त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी हैद्राबाद येथून मुंबईत आला होता. शनिवारी सायंकाळी तो त्याच्या बाईकवरुन पत्नीसोबत जात होता तर त्याच्या मागून त्याचे आई-वडिल रिक्षातून येत होते. यावेळी एका रिक्षाचालकाने त्याच्या बाईकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. याच कारणावरुन त्याने रिक्षाचालकाला जाब विचारला असता त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. काही वेळानंतर रिक्षाचालकाचे सहा मित्र तिथे आले आणि त्यांनी आकाशला बेदम लाथ्याबुक्यासह दगडाने मारहाण केली होती. या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही माहिती समजताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आकाशची पत्नी अनुश्री माईन हिच्या तक्रारीवरुन दिडोंशी पोलिसांनी पळून गेलेल्या मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

हत्येचा गुन्हा नोंेद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक मनोहर पगार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओम तोटावार, घार्गे, चंद्रकांत घार्गे, पोलीस उपनिरीक्षक देसाई व अन्य पोलीस पथकाने काही तासांत रिक्षाच्या क्रमांकावरुन अविनाश कदम याला ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच त्याच्या मित्रांच्या मदतीने आकाशला मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने पळून गेलेल्या अमीत विश्‍वकर्मा, आदित्य सिंग, जयप्रकाश आमटे, राकेश ढगळे, साहिल कदम या पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. अटकेनंतर या सर्वांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तीन आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यापैकी अविनाशविरुद्ध बोरिवली, पंतनगर पोलीस ठाण्यात दोन, आदित्य, जयप्रकाशविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page