मालाड येथे बीबीएच्या १९ वर्षांच्या तरुणीची आत्महत्या
इमारतीच्या २३ व्या मजल्यावरील उडी घेऊन जीवन संपविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बीबीएच्या दुसर्या वर्षांत शिकणार्या एका १९ वर्षांच्या तरुणीने मंगळवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. तिने तिच्या निवासी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी घेऊन जीवन संपविले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केली आहे. तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. तिच्या पालकासह मित्रमंडळी आणि नातेवाईकांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही तरुणी मालाडच्या एका पॉश इमारतीच्या अठरा मजल्यावरील फ्लॅटमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. सध्या ती परळच्या एका नामांकित कॉलेजमध्ये बीबीएच्या दुसर्या वर्षांत शिकत होती. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेली होती. दुपारी ती कॉलेजमधून घरी आली आणि दिड वाजता २३ व्या मजल्यावरील टेरेसवर गेली होती. तिथेच तिने तिची बॅग आणि मोबाईल ठेवला होता. त्यानंतर तिने टेरेसवरुन उडी घेतली होती. हा प्रकार समजताच स्थानिक रहिवाशांनी ही माहिती मालाड पोलिसांना दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी तिला जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. इमारतीमध्ये सीसीटिव्ही फुटेज आहे. हा प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाला आहे.
तिने आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. तिच्याकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. मात्र ती काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने इमारतीवरुन उडी घेऊन जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मालाड पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तिच्या पालकांसह नातेवाईक, स्थानिक आणि कॉलेजच्या मित्रांची लवकरच पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून तिने आत्महत्या का केली याचा उलघडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.