मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मित्राकडे दागिने ठेवण्यास दिले तसेच चारित्र्यावरुन होणार्या भांडणातून एका महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना मलबार हिल परिसरात उघडकीस आली आहे. योगिता सुमीत वेदवंशी असे हत्या झालेल्या २५ वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा तीस वर्षीय पती सुमीत लक्ष्मण वेदवंशी याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी रात्री उशिरा बारावाजता मलबार हिल येथील कंबाला हायस्कूलजवळील शिवाजीनगरात घडली. याच परिसरात रुम क्रमांक दहामध्ये योगिता ही तिचा पती सुमीतसोबत राहत होती तर तिची आई रुम क्रमांक ७० मध्ये राहत होताी. गेल्या काही दिवसांपासून सुमीत हा योगिताच्या चारित्र्यावरुन संशय होता. त्यातून तो तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होता. काही दिवसांपूर्वी पैशांची गरज असल्याने योगिताने तिचे काही दागिने तिच्या मित्राकडे गहाण ठेवले होते. ही माहिती अलीकडेच सुमीतला समजली होती. याच कारणावरुन त्याने तिच्याशी वाद घालणयास सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. मंगळवारी रात्री उशिरा याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्याने योगिताची गळा आवळून हत्या केली होती. हा प्रकार नंतर तिची आई लक्ष्मी सुरेश नाडलला समजताच तिने घटनास्थळी धाव घेतली होती.
योगिताला जवळच्या एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी लक्ष्मी नाडलच्या जबानीवरुन पोलिसांनी तिचा जावई सुमीत वेदवंशीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मित्राकडे दागिने गहाण ठेवले तसेच चारित्र्याच्या संशयावरुन सुमीतने योगिताची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.