दारुसाठी पैसे दिले नाही भावाकडून मोठ्या भावावर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत लहान भावाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादातून लहान भावाने त्याच्याच मोठ्या भावावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मलबार हिल परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात दिपेश गजानन कोथेरे हा २८ वर्षांचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन आरोपी भाऊ भावेश गजानन कोथेरे (२६) याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी १ जानेवारीला रात्री पावणेतीन वाजता मलबार हिल येथील नेपियन्सी रोड, रुगठा लेन परिसरात घडली. या परिसरातील जयप्रकाश नगरात गजानन बाळू कोथेरे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. दिपेश आणि भावेश हे दोेघेही त्यांचे मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा भावेशला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याला दारुसाठी पैसे हवे होते, त्यामुळे त्याने त्याचा लहान भाऊ दिपेशकडे दारुसाठी पैसे मागितले होते, मात्र त्याने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून भावेशने दिपेशवर डांबरी दगडयुक्त वस्तूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात दिपेश हा गंभीर जखमी झाला होता.
डोक्याला आणि चेहर्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गजानन कोथेरे यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भावेशविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.