अपहरण केलेल्या सहकारी तरुणाचे अश्‍लील व्हिडीओ काढले

लोन ऍप डाऊनलोड करुन कर्ज काढून पैशांचा अपहार केला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ डिसेंबर २०२४
मुंबई, – नोकरीवरुन काढल्याचा गैरसमाजातून एका २५ वर्षांच्या सहकारी तरुणाचे दोन तरुणांनी अपहरण करुन त्याला बेदम मारहाण करुन त्याचे अश्‍लील व्हिडीओ काढले, त्याला मद्यप्राशनासह नशा करण्यात प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. या तरुणाच्या मोबाईलवरुन चार वेगवेगळे लोन ऍप डाऊनलोड करुन सव्वासहा लाखांचे लोन घेऊन दोन लाख साठ हजाराचा अपहार केला. याप्रकरणी मालवणी पोलिसात गुन्हा दाखल होताच दोन्ही अपहरणकर्त्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. ऍगनल सॅबी गोम्स आणि आदित्य राजश्री बडेकर अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार तरुण आणि ऍग्नेल हे दोघेही एका कॉल सेंटरमध्ये कामाला होते, ऍग्नेलला कामावरुन काढण्यामागे तक्रारदार तरुण असल्याच्या संशयावरुन हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

२५ वर्षांचा तक्रारदार तरुण हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून मालाड येथे राहतो. याच परिसरातील एका खाजगी कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये तो कामाला आहे. याच कंपनीत ऍगनल हा पूर्वी कामाला होता. एप्रिल २०२४ रोजी त्याला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते. तक्रारदारामुळेच त्याला कामावरुन काढून टाकले. त्यानेच त्याच्याविषयी टिम लीडरला चुकीची माहिती दिल्याचा त्याला संशय होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. २४ डिसेंबरला पहाटे तीन वाजता कंपनीच्या कॅबमधून घराजवळ आला होता. घराच्या दिशेने जात असताना अचानक तिथे एक तरुण आला. त्याने त्याचे नाव विचारले. त्याने नाव सांगताच तिथे ऍगनेल आला. या दोघांनी लोखंडी कडयाने त्याच्या डोक्यावर हल्ला केला. त्याला शिवीगाळ करुन त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. मारहाण करुन त्याचे या दोघांनी अपहरण केले. तुझ्यामुळे माझी नोकरी गेली, आज तुझा हिसाब पूर्ण करतो अशी धमकी दिली.

त्याचा एटीएम घेऊन पासवर्ड घेऊन त्याने एटीएममधून काही कॅश काढली. त्याच्या मोबाईलवरुन चार वेगवेगळे लोन ऍप डाऊनलोड करुन त्याच्या नावाने सव्वासहा लाखांचे लोन काढले. त्यापैकी २ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन आणि एटीएमद्वारे काढून घेतली होती. काही वेळानंतर त्यांनी त्याला एका बारजवळ आणले. तिथे दारु घेतल्यानंतर त्यांनी त्याला दारु पिण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर ते तिघेही पार्कसाईट परिसरात आले. या ठिकाणी ऍगनेलचे तीन ते चार मित्र नशा करत होते. पार्कसाईटनंतर पवई आणि बोरिवली येथे आणल्यानंतर ते तिथेच झोपले होते.

सकाळी उठल्यानंतर ते सर्वजण पुन्हा ऍगनेलच्या घरी गेले. यावेळी त्याच्या वडिलांनी त्याची सुटका करतो, मात्र त्याने त्याच्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार करु नकोस असे सांगितले. त्यानंतर त्यांनी एका कोर्‍या कागदावर त्याचे नाव, पत्ता, नोकरीसह इतर माहिती लिहून घेतली. तसेच त्याच्यामुळेच त्याची नोकरी गेल्याची कबुली देण्यास प्रवृत्त केले. त्याला पुन्हा लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. काही वेळानंतर त्याला कपडे काढण्यात प्रवृत्त करुन गांजा देऊन नशा करण्यास प्रवृत्त केले. त्याचे त्याने नशा करताना अश्‍लील व्हिडीओ काढले. त्याला पुन्हा बेदम मारहाण करुन त्यांनी त्याला गोरेगाव येथील ऑरबीट मॉलजवळ सोडले. पोलिसांत तक्रार केल्यास त्याला जिवे मारण्यासह त्याचे अश्‍लील व्हिडीओ व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

या प्रकाराने त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे घडलेला प्रकार त्याने त्याच्या मित्राला सांगितला. त्याने त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते दोघेही मालवणी पोलीस ठाण्यात आले होते. घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगून त्याने ऍगनल गोम्स आणि आदित्य बडेकर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची मालवणी पोलिसांनी गंभीर दखल घेत या दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ऍगनल आणि आदित्य या दोघांना काही तासांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चोकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page