लैगिंक अत्याचारानंतर प्रेयसीला गर्भपात करण्यास प्रवृत्त केले
मालाड येथील घटना; २५ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ ऑगस्ट २०२४
मुंबई, – चार वर्ष लैगिंक अत्याचार करुन प्रेयसीला गर्भपात करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रसाद नावाच्या २५ वर्षांच्या प्रियकराविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून प्रसादने तिच्यावर अनेकदा शारीरिक संबंध ठेवून चार वर्षांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार देत तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकल्याचा आरोप आहे.
२४ वर्षांची पिडीत तरुणी ही मालाड येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. सहा वर्षांपूर्वी ती मालाड येथील एका ऍनिमेशन कोर्ससाठी जात होती. दोन वर्षांनंतर तिची प्रसादशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. सोशल मिडीयासह मोबाईलवरुन ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. अनेकदा ते आक्सा बिच, दाणापाणी येथे भेटत होते. या भेटीदरम्यान त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. तिनेही त्यास होकार दिला होता. त्यानंतर त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. प्रत्येक वेळेस तो लग्नाचे आमिष दाखवत होता. याच दरम्यान ती गरोदर राहिली होती. मुलाची जबाबदारी घेण्यास सक्षम नसल्याचे सांगून त्याने तिला जबदस्तीने गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. मे २०२४ रोजी तिने त्याला लग्नाविषयी विचारणा सुरु केली होती, मात्र तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. काही दिवसानंतर त्याने तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. तिच्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले होते.
जुलै २०२४ रोजी प्रसाद तिला भेटण्यासाठी मालाड येथे आला होता. यावेळी त्याने तिच्याशी लग्न करण्यास स्पष्टपणे नकार देत त्याला पुन्हा संपर्क साधण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न करु नकोस असे सांगितले. त्यामुळे घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यांनी तिला धीर देत त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रसादविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ६९, ८९ भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकच प्रसादची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.