जुन्या वादातून सतरा वर्षांच्या मुलाला मित्राने भोसकले
सोळा वर्षांचा आरोपी मुलाची डोंगरी सुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – दोन दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादातून सतरा वर्षांच्या मित्राच्या गळ्यावर त्याच्याच सोळा वर्षांच्या आरोपी मित्राने चाकूने भोसकल्याची घटना मानखुर्द परिसरात उघडकीस आली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या साहिल सुरळकर याला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो सोळा वर्षांचा असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
ही घटना गुरुवारी 16 ऑक्टोंबरला सकाळी साडेसहा वाजता मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठेनगर, सागर चाळीत घडली. याच चाळीत रोहित नामदेव घरत हा राहत असून त्याचा गणपतीच्या मूर्त्या बनविण्याचा व्यवसाय आहे. साहिलसह सोळा वर्षांचा आरोपी त्याचे मित्र असून त दोघेही याच परिसरात राहतो. गेल्या आठवड्यात या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. ते दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी या भांडणात मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी रात्री रोहित हा त्याचे मित्र साहिल, विशाल गुप्ता, दाऊद शेख, अत्तु शेख यांच्यासोबत त्याच्या रुममध्ये होता.
जेवण करुन ते सर्वजण झोपण्याच्या तयारीत होते. याच दरम्यान तिथे आरोपी मुलगा आला आणि काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील चाकूने साहिलच्या गळ्यावर वार केले होते. त्यात साहिल हा गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी आरोपीने साहिलचा गेम केला आहे, त्यामुळे जास्त आवाज केल्यास तुमचाही गेम करुन टाकीन, माझ्याशी दुश्मनी केली तर त्याची अवस्था अशीच होईल अशी धमकी दिली. त्यानंतर तो तेथून पळून गेला होता. या घटनेनंतर राहितसह इतर मित्रांनी गंभीररीत्या जखमी झालेल्या साहिलला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे.
हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहित घरत याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सोळा वर्षांच्या आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो अल्पवयीन असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.