एक दिवसांचे नवजात अर्भक टाकून अज्ञात व्यक्तीचे पलायन
अर्भकाचा परित्याग करणार्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – एक दिवसांच्या नवजात अर्भक टाकून अज्ञात व्यक्तीने पलायन केल्याची घटना मालाडच्या बँक रोडवर घडली. स्त्री जातीच्या या अर्भकाला पुढील उपचारासाठी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मुलीचा जन्म लपविण्यासाठी उद्देशाने तिच्याच पालकांनी तिचा परित्याग केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
राकेश रामचंद्र माने हे दादरच्या नायगाव पोलीस वसाहतीत राहतात. सध्या ते बांगुरनगर पोलीस ठाण्यात कामाला आहेत. शनिवारी रात्री आठ वाजता ते नाईट शिफ्टसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर ते मसुब प्रताप अर्जुन पाटील यांच्यासोबत बीट मार्शन कर्तव्यावर परिसरात गस्त घालत होते. रात्री साडेअकरा वाजता त्यांना मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून एक कॉल आला होता. यावेळी मालाडच्या बँक रोड, अॅथेना टॉवरजवळील ाददोन ट्रॅव्हेल्स बसमध्ये एक नवजात अर्भक पडला असून पोलीस मदतीची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते प्रताप पाटील यांच्यासोबत तिथे रवाना झाले होते.
घटनास्थळी असलेल्या पुखराज भगाराम चौधरी आणि सतीश जितेंद्र राऊत यांनी पोलिसांना त्यांनीच ते अर्भक पडल्याचे पाहिले आणि कंट्रोल रुमला कॉल केल्याचे सांगितले. त्यानंतर स्त्री जातीच्या या अर्भकाला निर्भया मोबाईल वाहनातून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशानंतर ते अर्भक जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर राकेश माने यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नवजात अर्भकाचा परित्याग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.