क्षुल्लक वादातून २३ वर्षांच्या तरुणावर प्राणघातक हल्ला
मानखुर्द येथील घटना; ४० वर्षांच्या हल्लेखोराला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून सर्फराज निसार शाह या २३ वर्षांच्या तरुणावर त्याच्याच परिचित आरोपी मित्राने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या खलील अब्दुल शेख या ४० वर्षांच्या हल्लेखोर आरोपीस पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्फराज हा मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठेनगर, विश्वशक्ती चाळीत राहतो. याच परिसरात खलील हा राह असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता सर्फराज हा त्याचा मित्र खुर्शीद, अनस यांच्यासोबत डब्बा कंपनी येथील मैदानात गाप्पा मारत होता. यावेळी तिथे खलील आला आणि त्याने क्षुल्लक कारणावरुन सर्फराजशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्याकडील तिक्ष्ण हत्याराने त्याच्याा डोक्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो जखमी झाला होता. त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार मानखुर्द पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी खलील शेख याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. हल्ल्यानंतर खलील तेथून गेला. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना खलील मानखुर्द येथून पोलिसांनी अटक केली. तपासात खलील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खंडणीसह मारामारीच्या दोन गुन्ह्यांची नोंद आहे. या दोन्ही गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर होता.