मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – आर्थिक वादातून नसरुद्दीन मेहबूबसाब पठाण या ४५ वर्षांच्या व्यक्तीवर चारजणांच्या टोळीने तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या चारही हल्लेखोरांना काही तासांत अटक केली आहे. सोहेल जहॉंगीर शेख ऊर्फ फतेह, रहिम सिंकदर खान, हसरत मुर्शरफ खान आणि सिद्धार्थ संजू जगते ऊर्फ बाब्या अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन वाजता मानखुर्द येथील मंडाला, माय्यका मंदिराजवळ घडली. हुसैन मेहबूबसाब पठाण हा गोवंडीतील शिवाजीनगर बैंगनवाडी परिसरात राहत असून चालक म्हणून काम करतो. नसरुद्दीन हा त्याचा मोठा भाऊ आहे. गेल्या काही दिवसांपासून सिद्धांत आणि सोहेल आणि नसरुद्दीन यांच्यात आर्थिक वाद सुरु होता. त्यातून त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी रात्री नरुद्दीन हा मानखुर्दच्या माय्यका मंदिराजवळ आला होता. यावेळी सिद्धांतसह इतर तिघांनी त्याच्याशी पैशांवरुन वाद सुरु केला होता. त्यातून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात सोहेलने त्याच्याकडील तलवारीने त्याच्या गळ्यावर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे नसरुद्दीनला स्थानिक रहिवाशांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. तो बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्याचा भाऊ हुसैन पठाण याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी हल्ल्यानंतर पळून गेलेल्या चारही आरोपींना गोवंडी आणि मानखुर्द येथून अटक केली. चौकशीत आर्थिक वादातून हा हल्ला झाल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.