खाजगी संकेतस्थळावर प्रोफाईल पाहून तरुणीची फसवणुक
लग्नांच्या आमिषाने गंडा घालणार्या ठगाला अटक व कोठडी
लग्नांच्या आमिषाने तरुणीला गंडा घालणार्या ठगाला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२४
मुंबई, – लग्न जुळविणार्या संकेतस्थावर ओळख काढून लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरुणींना विविध बोगस कारण सांगून फसवणुक करणार्या एका ठगाला वनराई पोलिसांनी अटक केली आहे. निमेश बाबूभाई चौटालिया असे या ठगाचे नाव असून त्याने अलीकडेच एका ३८ वर्षांच्या महिलेची सुमारे साडेतेरा लाखांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याची आई जयश्री बाबूभाई चौटालिया हिला सहआरोपी दाखविण्यात आले आहे. निमेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच इतर काही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती.
३८ वर्षांची तक्रारदार तरुणी गोरेगाव परिसरात राहते. तिने तिच्या लग्नासाठी एका लग्न जुळविणार्या संकेतस्थळावर स्वतची वैयक्तिक माहिती अपलोड केली होती. डिसेंबर २०२३ तिला निमेश नावाच्या एका व्यक्तीची रिक्वेस्ट आली होती. त्याचा प्रोफाईल पाहिल्यानंतर तिने त्याची रिक्वेस्ट स्विकारली होती. याच दरम्यान त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले होते. यावेळी निमेशने तो त्याच्या आई-वडिलांसोबत विलेपार्ले येथे राहत असल्याचे सांगून गुगल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिने त्याला गोंदिया येथे बोलावून तिच्या आई-वडिलांची भेट घेण्यास सांगितले. मात्र ही भेट होण्यापूर्वीच त्याने तिला कॉल करुन त्याला महत्त्वाच्या कामानिमित्त सिंगापूरला जावे लागत आहे. त्यामुळे सिंगापूर येथून परत आल्यानंतर त्याने तिच्या आई-वडिलांना भेटण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते.
याच दरम्यान त्याने तिला गुगलची नोकरी सोडून दिली असून त्याला नोकरी सोडल्यामुळे कंपनीने बारा कोटीचा दंड मारला आहे. दंडाची ही रक्कम न भरल्यामुळे त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात कंपनीने केस टाकली आहे. त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यातच त्यांची चांगली ओळख होऊन मेत्री झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यामुळे तिने कुठलीही शहानिशा न करता तिने त्याला एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत टप्याटप्याने २२ लाख १५ हजार रुपये पाठविले होते. त्यापैकी आठ लाख सत्तर हजार रुपये त्याने तिला परत केले होते. याच दरम्यान ती त्याच्या विलेपार्ले येथील सरोजिनी रोड, एलआयसी कॉलनी, पारेख अपार्टमेंटच्या बी विंगच्या फ्लॅट २०६ मध्ये गेली होती. तिथेच तिची निमेशच्या आई-वडिलांशी ओळख झाली होती. त्यांनीही तिला निमेश सध्या आर्थिक अडचणीत असून त्याने त्याच्या काही मित्रांकडून उसने पैसे घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तिची पहिल्यांदा सीएसएमटीजवळील मॅकडोनाल्डजवळ भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात केससंदर्भात सविस्तर चर्चा झाली होती.
या भेटीदरम्यान तिने तिच्या उर्वरित साडेतेरा लाखांचा विषय काढला होता. यावेळी त्याने उर्वरित पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्याने तिला पैसे दिले नाही. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने तिला स्वतसह कुटुंबियांसोबत आत्महत्या करणार असल्याचे सांगून तिच्या मनात भीती घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने तिचे कॉल घेणे बंद केले होते. त्यामुळे तिने त्याची आई जयश्री बाबूभाई चौटालिया हिची भेट घेऊन तिला हा प्रकार सांगितला. यावेळी तिने तिच्याच मुलाची बाजू घेत तिला दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला.
चौकशीदरम्यान तिला निमेशने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले असून याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली होती अशी माहिती समजली होती. या माहितीने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने वनराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निमेश चौटालिया याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने आतापर्यंत कोणाकोणाला किती रुपयांची गंडा घातला आहे याचा तपास करत आहेत