व्यावसायिकाच्या घरी सोळा लाखांची घरफोडी
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ डिसेंबर २०२४
मुंबई, – माझगाव येथे राहणार्या व्यावसायिकाच्या घरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यानी फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे सोळा लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. सोमवारी उघडकीस आलेल्या या घरफोडीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना २० डिसेंबर ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत माझगाव येथील बॅरीस्टर नाथ पै मार्ग, न्यू रे रोड सहकारी सोसायटीमघ्ये घडली. या सोसायटीच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २६५ मध्ये होमेंद्र अली कारी हे त्यांची पत्नी आणि दोन मुलासोबत राहतात. ते व्यावसायिक असून त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. २५ नोव्हेंबरला त्यांची पत्नी शिबा ही एका लग्नासाठी अमेरिकेत गेली होती. यावेळी तिने तिचे सर्व दागिने कपाटातील लॉकरमध्ये ठेवून लॉकरची चावी त्यांच्याकडे दिली होती.
२० डिसेंबरला ते त्यांच्या दोन्ही मुले आणि मित्रांसोबत महाबळेश्वर फिरायला गेले होते. २३ डिसेंबरला ते महाबळेश्वर येथून घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घराच्या सेफ्टी दरवाजाचे लॉक लावलेले कडीकोयंडा तुटलेले होते. मेन दरवाजाचे लॅचलॉकदेखील तुटले होते. त्यामुळे त्यांनी घरात प्रवेश करुन पाहणी केली होती. याववेळी त्यांना बेडरुममध्ये सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. कपाटाची पाहणी केल्यानंतर लॉकरमधील सर्व दागिने चोरीस गेले होते. चोरट्यांनी सुमारे सोळा लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. त्यामुळे त्यांनी त्यांची मोलकरणीला कॉल केले होते.
यावेळी तिने २१ डिसेंबरला ती दुपारी तीन ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत घरी होती. घरातील सर्व साफसफाई करुन ती निघून गेली होती. तोपर्यंत घरात चोरी झाली नव्हती. ती काम करुन निघून गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरी केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर त्यांनी भायखळा पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर होमेंद्र कारी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.