मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जानेवारी २०२४
मुंबई, – सांगलीच्या एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देतो असे सांगून एका टोळीने नऊजणांची सुमारे ४५ लाखांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सेज ऍकेडमीच्या चार प्रमुख पदाधिकार्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आराध्या चतुर्वेदी, अमीत शर्मा, प्रतिक्षा आंग्रे आणि रविंदर साकेत अशी या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी कार्यालयाला टाळे लावून पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही पालकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.
सूर्यकांत माणिकराव गायकवाड हे चेंबूर येथे त्यांच्या पत्नी वंदना आणि अठरा वर्षांची मुलगी किर्तीसोबत राहतात. सात वर्षांपूर्वी ते रिझर्व्ह बँकेतून क्लार्क म्हणून निवृत्त झाले आहेत. किर्तीचे बारावीपर्यंत सायन्समधून शिक्षण झाले असून तिने नीटची परिक्षा दिली होती. त्यात ती पात्र झाली होती. तिला एमबीबीएसमध्ये प्रवेश हवा होता. त्यासाठी तिने साकिनाका येथील सेज ऍकेडमी येथे प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यासंदर्भात एक माहिती पाहिली होती. या माहितीची शहानिशा केल्यांनतर सूर्यकांत गायकवाड यांनी तिथे संपर्क साधला होता. यावेळी प्रतिक्षा आंग्रे नावाच्या महिलेने त्यांना प्रवेशाबाबत फोनवरुन माहिती दिली जात नसून प्रत्यक्षात येऊन बोलावे लागेल असे सांगितले. यावेळी तिने त्यांना त्यांच्या मुलीचे एमबीबीएससाठी सांगली येथील आश्विनी प्रकाश इन्स्टूट्यूट कॉलेजमध्ये प्रवेश कमीत कमी बजेटमध्ये करुन देण्याचे आश्वासन देताना येताना काही चेक घेऊन येण्यास सांगितले.
४ नोव्हेंबर २०२४ रोजी ते स्वत एरोसिटी येथील त्यांच्या कार्यालयात गेले होते. तिथेच त्यांची प्रतिक्षा आंग्रे, आराध्या चतुर्वेदी आणि रविंदर साकेत यांच्याशी ओळखझाली होती. ते तिघेही सेेज ऍडकमीचे प्रमुख असल्याचे सांगून त्यांना त्यांच्या मुलीचे मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देताना सध्या एक सीट शिल्लक असल्याचे सांगितले. तसेच या प्रवेशासाठी त्यांना ६८ लाख ५० हजार रुपये इतका खर्च येईल असे सांगितले. त्यांनी होकार दर्शविल्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी प्रवेशाची प्रकिया सुरु करण्यासाठी पाच लाख रुपये घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांच्या मुलीला प्रवेशाबाबत काही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी सांगलीच्या संबंधित कॉलेजमध्ये संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी सेज ऍकेडमीची माहिती सांगून प्रवेशाबाबत माहिती विचारली होती. तिथे उपस्थित कर्मचार्यांना अशा प्रकारे कोणालाही एमबीबीएससाठी प्रवेश मिळत नाही. तसेच सेज ही संस्थाच बोगस असल्याचे सांगितले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. चौकशीदरम्यान त्यांना या आरोपींनी मणियार हाकीम युसूफ, राजकुमार हरिभाऊ मस्के यांच्याकडून प्रत्येकी सहा लाख, आषिमा जितेश खुराणा, प्रविण मधकर गुप्ता, वसंत भाऊराव पिपारे यांच्याकडून प्रत्येक पाच लाख, आराधना अरुणकुमार मिश्रा हिच्याकडून पाच, सुभाष पांडुरंग रसाळ यांच्याकडून साडेसहा तर प्रविण छडेजा यांच्याकडून अडीच लाख असे ४५ लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांच्या मुलांना एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून दिला होता. ही रक्कम घेतल्यांनतर ते सर्वजण कार्यालयाला टाळे लावून पळून गेले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी साकिनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आराध्या चतुर्वेदी, अमीत शर्मा, प्रतिक्षा आंग्रे आणि रविंदर साकेत या चारही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटवकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने आतापर्यंत नऊजणांची ४५ लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले असले तरी त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.