पेल्हार येथे सुरु असलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश

13 कोटीच्या एमडी ड्रग्जसहीत पाच आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – नालासोपारा येथील पेल्हार, रशिद कंपाऊंडमध्ये सुरु असलेल्या एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा टिळकनगर पोलिसांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत पाचजणांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीने कारखान्यात बनविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या एमडी ड्रग्जचा मुंबईसह इतर शहरात विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोहेल अब्दुल रौफ खान, मेहताब शेरअली खान, इक्बाल बिलाल शेख,, मोहसीन कय्युम सय्यद आणि आयुबअली आबूबकर सिद्धीकी अशी या पाचजणांची नावे आहेत. ते सर्वजण पनवेल, घाटकोपर, गोवंडीचे रहिवाशी आहेत. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी 13 कोटी 38 लाख 53 हजार 700 रुपयांचा एमडी ड्रग्जसहीत ड्रग्जसाठी लागणारा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींच्या चौकशीतून त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात एमडी ड्रग्जच्या तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी असल्याने या ड्रग्जची सर्रासपणे विक्रीचे प्रकार सुरु होते. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना 5 ऑक्टोंबरला टिळकनगर परिसरात एक पेडलर एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून सोहेल खानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून त्याला ते एमडी ड्रग्ज तिघांनी दिल्याचे उघडकीस आले होते, त्यानंतर त्याच्या तीन सहकार्‍यांना मुंबईसह मिरारोड परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून नालासोपारा येथील भावखळ, खैरपाडा, रशीद कंपाऊंड परिसरात एमडी ड्रग्जचा एक कारखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा कुलकर्णी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, विलास पवार, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह देशमुख, सुशांत साळवी, अजय गोल्हर, पोलीस हवालदार राणे, आखाडे, भिलारे, सावंत, उपाध्याय, दिवटे, पोलीस शिपाई पुंजारी, केदार, भिसे, झिणे, राऊत, सानप, नागरगोजे, काटकर आदींनी रशीद कंपाऊडमधील एमडी ड्रग्ज कारखान्यात छापा टाकला होता. यावेळी तिथे एमडी ड्रग्ज उत्पान करणार्‍या अन्य एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.

या कारखान्यातून पोलिसांनी 6 किलो 675 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणसाठी साहित्य असा 13 कोटी 38 लाख 53 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणारे चार तर उत्पादन करणारा एक अशा पाचजणांना अटक केली. अटक आरोपींपैकी सोहेल हा घाटकोपर, मेहताब, इक्बाल आणि मोहसीन हे तिघेही गोवंडी तर आयुबअली हा पनवेल परिसरात राहतो. या पाचजणांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

एमडी ड्रग्ज बनविणारी ही एक टोळी असून या टोळीने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज बनवून त्याची मुंबईसह आसपासच्या शहरात विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या इतर सहकार्‍यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

एमडी ड्रग्ज कारखान्यातील काही महत्त्वाच्या कारवाया
ऑक्टोंबर 2025 – नालासोपारा येथील भावखळ, खैरपाडा, रशीद कंपाऊंड परिसरात टिळकनगर पोलिसांनी कारवाई करुन एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 6 किलो 675 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, ड्रग्ज बनविण्यासाठी लागणसाठी साहित्य असा 13 कोटी 38 लाख 53 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जुलै 2025 – गॅरेजच्या आड सुरु असलेल्या एमडी ड्रग्जचा कारखान्याचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. कर्नाटकच्या म्हैसूर शहरात सुरु असलेल्या या कारखान्यातून पोलिसांनी 381 कोटी 94 लाख रुपयांचा 187 किलो 97 लाखांचे एमडी ड्रग्ज, 45 हजार रुपयांचे दोन ओव्हन, 1 लाख 20 हजार रुपयांचे बारा हिटिंग मशिन, 65 हजार रुपयांचे 168 किलो आयसोप्रोपीलिन अल्कोल, 20 हजाराचे 168 किलो अ‍ॅसिटोन, 12 हजाराचे 60 किलो क्लोरोफॉर्म, बाराशे रुपयांचे 24 किलो 950 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट तसेच एमडी बनविण्यासाठी लागणारे प्लास्टिक व काचेचे ट्रे, प्लास्टिक टब, बादल्यासह इतर साहित्य असा 281 कोटी 96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याच गुन्ह्यांत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.
एप्रिल 2025 – वसई येथील एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश करुन सुमारे आठ कोटीचे एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त केले होते. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. सिमेंट ब्लॉक बनविणार्‍या कंपनीत हा एमडी ड्रग्जचा कारचखाना सुरु होता.
सप्टेंबर 2024 – बदलापूर येथे सुरु असलेल्या एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा घाटकोपर युनिटच्या अ‍ॅण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी एका उच्चशिक्षित तरुणासह चार आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 33 लाख 60 हजाराचा एमडी ड्रग्ज, 1580 किलो पांढर्‍या रंगाची पावडर, चार मोबाईल व इतर मुद्देमाल असा सुमारे 82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मार्च 2024 – सहा सहा महिन्यांपासून सांगलीतील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या एमडी ड्रग्जच्या कारखान्यांचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दहाजणांच्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 252 कोटी 28 लाख रुपयांचे 126 किलो 141 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, 15 लाख 88 हजार रुपयांची कॅश, दिड लाखाचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची एक स्कोडा कार असा 252 कोटी 55 लाख 38 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ऑक्टोंबर 2023 – खार येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन बंधूंना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा कोटी रुपयांचे पाच किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यांच्या चौकशीनंतर या पथकाने सोलापूर येथील चिंचोली, एमआयडीसी परिसरात सुरु असलेल्या एका एमडी ड्रग्ज कारखान्यात कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी तीन किलो एमडी ड्रग्जसह एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणारे 50 ते 60 किलो कच्चा माला असा सुमारे शंभर कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 8 किलो 95 किलो एमडी ड्रग्ज तर 50 ते 60 किलो कच्चा माल असा 116 कोटीचा मुद्देमाल जप्त केला होता.
ऑक्टोंबर 2023 – नाशिक येथील एका कारखान्यात तयार होणार्‍या एमडी ड्रग्जची विविध शहरात विक्री करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात साकिनाका पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत या टोळीतील बारा आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून 151 किलो 305 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त केला आहे. त्याची किंमत 300 कोटी 26 लाख 10 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page