स्वस्तात म्हाडाचा फ्लॅट देण्याच्या आमिषाने फसवणुक
एक कोटींना गंडा घालणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटसाठी घेतलेल्या एक कोटीचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी चौकडीविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सचिन सुरेश धुरी, योगेश पांडुरंग पोटे, सतीश सुरेश जाधव आणि महादेव पंढरीनाथ बोधले अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांी म्हाडा सोडतीसह लॉटरीचे विविध बोगस दस्तावेज दाखवून ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल होताच चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे बोलले जाते.
४३ वर्षांचे प्रशांत कांतीलाल जैन हे मालाडच्या अहिंसा मार्ग, सुंदरनगरचे रहिवाशी आहे. ते झव्हेरी बाजार परिसरातील एका ज्वेलर्स व्यापार्याच्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतात. चौदा वर्षांपूर्वी त्यांचा स्वतचा सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय होता. काळबादेवी येथे ओम ज्वेलर्स नावाचे एक दुकान होते. २०१९ रोजी त्यांची सचिन धुरी, योगेश पोटे, महादेव बोधले आणि सतीश जाधव यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीत योगेशने सचिन हा म्हाडामध्ये कामाला असून म्हाडाच्या सदनिका सोडत वितरण अधिकारी आहे. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्याचे ओळखपत्र आणि व्हिजिटिंग कार्ड दाखविले होते. म्हाडा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोक्याच्या ठिकाणी जागा संपादित करुन सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात घरे उपलब्ध करुन देते. म्हाडाने बांधलेल्या दहा हजार घरासाठी आतापर्यंत दोन लाखापेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले आहे. या अर्जाची निवड लॉटरी पद्धतीने होऊन नंतर संबंधित अर्जदारांना म्हाडाचे घर दिले जाते. म्हाडाची खुल्या बाजारात सोडतीशिवाय घर खरेदी करायचे असेल तर त्यांना २५ टक्के रक्कम जादा देऊन म्हाडाकडून घर मिळते असे सांगून त्यांना म्हाडाचे घर स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी म्हाडा घरासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यांना म्हाडाचे घर मिळवून देण्याची विनंती केली होती.
जुलै २०२१ रोजी त्यांनी त्यांची मालाडच्या एका रेस्ट्रॉरंटमध्ये तीन व्यक्तींशी ओळख करुन दिली होती. ते म्हाडा घराच्या सोडतीमधील मूळ लाभार्थी होते असे सांगण्यात आले होते. त्यांच्याकडे म्हाडाचे काही कागदपत्रे होती. त्यांना परळ आणि दादर येथे म्हाडाचे घर लागले होते. त्यामुळे त्यांनी म्हाडाच्या घरासाठी अधिक रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती. जुलै ते ऑक्टोंबर २०२१ रोजी त्यांनी चारही आरोपींना टप्याटप्याने १ कोटी दोन लाख रुपये दिले होते. यावेळी त्यांनी त्यांना म्हाडाच्या सोडेत आणि लॉटरी पद्धतीचे विविध घराचे बोगस कागदपत्रे आणि व्हिजीटिंग कार्ड दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत म्हाडाच्या घराचा ताबा दिला नाही. सरकार बदलले आहे, त्यामुळे म्हाडाचे साहेब बदलले आहे. कोरोनामुळे म्हाडाचे काम थांबले आहे असे विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्यांनी इतर काही लोकांचे काम झाले असून त्यांना घराचा ताबा मिळाला आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरच म्हाडाचे घर मिळेल असे सांगून त्यांचा विश्वास तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. याच दरम्यान या चौघांनी त्यांना म्हाडाचा एक फ्लॅट उपलब्ध असून त्याची किंमत एक कोटी आहे. दिड कोटीमध्ये या फ्लॅटची खुल्या बाजारात विक्री होत आहे. त्यामुळे त्यांनी तोच फ्लॅट घ्यावा असे सांगून त्यांना दोन आठवड्यात घराचा ताबा देतो असे सांगितले.
हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सचिन धुरीविषयी म्हाडामध्ये चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना सचिन धुरी नावाचा कोणीही अधिकारी म्हाडामध्ये कार्यरत नसल्याचे समजले. या आरोपींनी सचिन हा म्हाडाचा अधिकारी असल्याचा बतावणी त्यांना म्हाडाचा खुल्या बाजारातील घर स्वस्तात देतो असे सांगून एक कोटी दोन लाख रुपये घेऊन घराचा ताबा न देता त्यांची फसवणुक केली ोती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट नको, फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत करा असा तगादा ावला होता. मत्र त्यांनी पैसे परत केले नाही. गेल्या तीन वर्षांपासून ते चौघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चारही आरोपीविरुद्ध मालाड पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सचिन धुरी, योगेश पोटे, सतीश जाधव आणि महादेव बोधले या चौघांविरुद्ध म्हाडाचे बोगस दस्तावेज बनवून घरासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या चौघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.