वर्हाडी म्हणून प्रवेश करुन लग्न कार्यक्रमांतील चोरीचा पर्दाफाश
फोटोग्राफरच्या सतर्कमुळे २१ वर्षांच्या तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील एका लग्नाच्या हॉलमध्ये वर्हाडी म्हणून प्रवेश करुन नवविवाहीत वर-वधूंना देण्यात आलेल्या मौल्यवान भेटवस्तू चोरी करणार्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी मानव नोजल सिसोदिया या २१ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
उमेश नरेंद्र राय हे नालासोपारा येथे राहत असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. बुधवारी ४ डिसेंबरला त्यांचा पुतणया पराग याचा विवाह होता. त्यासाठी उमेश राय हे त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील लग्नाच्या हॉलमध्ये आले होते. दिवसा लग्नविधी तर सायंकाळी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडेदहा वाजता नवविवाहीत वर-वधूंचे फोटोशूट सुरु होते. तसेच लग्नात आलेले पाहुणे त्यांना भेटवस्तू देत होते. याच दरम्यान एक तरुण तिथे संशयास्पद फिरताना फोटोग्राफरला दिसून आला. काही वेळानंतर त्याने स्टेजवरील भेटवस्तू उचचली आणि तो तेथून निघू लागला. हा प्रकार संशयास्पद वाटताच या फोटोग्राफरने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पळू लागला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्याच्याकडे पाहुण्याकडून देण्यात आलेले काही भेटवस्तू सापडले. तो चोरीच्या उद्देशाने तिथे आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हॉलच्या मॅनेजरने ही माहिती एमएचबी पोलिसांना दिली.
काही वेळानंतर तिथे पोलीस आल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशीत या तरुणाचे नाव मानव सिसोदिया असल्याचे उघडकीस आले. तो मूळचा मानव हा मध्यप्रदेशच्या राजगढ, कडिया गावचा रहिवाशी आहे. विविध लग्नाच्या कार्यक्रमांत चोरी करणार्या टोळीचा मानव हा सदस्य असून ही टोळी वर्हाडी म्हणून प्रवेश करुन मौल्यवान भेटवस्तूसह इतर ऐवज चोरी करते. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते वधू-वरांना गिफ्टदेखील देतात. त्यानंतर रेकी करुन भेटवस्तू चोरी करुन पलायन करतात अशी या टोळीची मोडस आहे. मानवला चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लग्नाच्या कार्यक्रमांत प्रवेश करुन चोरी केली आहे का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.