मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – मलनिस्सारण वाहिनीवर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी झाकणे चोरी करणार्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका दुकलीस पोलिसांनी अटक केली. राजेश तारक मंडल आणि माजिद आजिद शेख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी पाच लोखंडणी झाकण चोरी केल्याची कबुली दिली असून त्यापैकी दोन झाकणे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
गेल्या काही दिवसांत भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने मनपाने मलनिस्सारण वाहिनीवर बसविलेल्या लोखंडी झाकणाची चोरी होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. भंगार गोळा करण्याचा बहाणा करुन ही टोळी झाकणे चोरी करुन पळून जात होते. काही वर्षांपूर्वी मॅनहोलचे झाकण उघडे असल्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशा घटना घडू नये म्हणून मनपाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. २२ जुलैला दहिसर येथल जयवंत सावंत रोड, दिपा हॉटेलजवळ महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला मलनिस्सारण वाहिनीवर सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले पाच लोखंडी झाकणे चोरीस गेले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी लक्षात येताच महानगरपालिकेच्या वतीने प्रकाश संपत सूर्यवंशी यांनी एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. जवळपास तीस ते चाळीस सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पोलिसांना दोन संशयित आरोपी तिथे फिरताना दिसून आले होते.
याच फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, मंगेश किरपेकर, पोलीस हवालीदार जोपाळे, खोत, परीट, देवकर, पोलीस शिपाई आहेर, सवळी, शेरमाळे, मोरे यांनी दहिसर येथून राजेश मंडल आणि माजिद शेख या दोघांना ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ५० हजार रुपयांच्या किंमतीचे पाच लोखंडी झाकणे चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दोन लोखंडी झाकणे पोलिसांनी हस्तगत केले आहे. यातील राजेश मिरारोड तर माजिद हा दहिसर येथे राहत असून ते दोघेही भंगार जमा करण्याचे काम करतात. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.