अश्‍लील मॅसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी

महिलेच्या तक्रारीवरुन डिलीव्हरी बॉयला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ जुलै २०२४
मुंबई, – अश्‍लील मॅसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी करुन एका महिलेची विनयभंग केल्याप्रकरणी एका डिलीव्हरी बॉयला बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने चारकोप परिसरात अटक केली. रोहित राजेंद्र पवार असे या ३८ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप झाल्याचे बोलले जाते.

रोहित हा कांदिवलीतील चारकोप, सेक्टर दोनच्या प्रकाश-किरण सोसायटीचा रहिवाशी असून सध्या एका खाजगी कंपनीत डिलीव्हरी बॉयचे काम करतो. ५ जुलैला त्याने एका महिलेला वडापावची ऑर्डर डिलीव्हरी केली होती. ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत गोरेगाव परिसरात राहते. शुक्रवारी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्यामुळे तिने ऑनलाईन वडापावची डिलीव्हरी केली होती. ही डिलीव्हरी रोहितने केली होती. यावेळी त्याने तिच्याकडे वॉशरुम वापरु शकतो का अशी विचारणा केली होती. मात्र त्याच्या तोंडातून उग्र वास येत असल्याने तिने त्याला नकार दिला होता. तो निघून गेल्यानंतर तिने ऑर्डर उघडून पाहिले, त्यात वडापाव नव्हते. त्याने चुकीची ऑर्डर डिलीव्हरी केली होती. त्यामुळे तिने ऍपवरुन फोन करुन चुकीची ऑर्डर आल्याचे सांगितले. हा कॉल रोहितला घेतला होता. काही वेळानंतर रोहितने तिच्या मोबाईलवर अश्‍लील मॅसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती. या प्रकाराने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून डिलीव्हरी बॉयविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्यविरुद्ध ७५, ७८ भारतीय न्याय संहिता सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

गुन्हा दाखल होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक तांबे, राहुल भदरगे, पोलीस हवालदार बळीराम गोवळकर, किशोर तावडे यांनी तपास सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रोहितला कांदिवलीतील चारकोप परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने तक्रारदार महिलेला अश्‍लील मॅसेज पाठवून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून त्यात पोलिसांना अनेक आक्षेपार्ह बाबी असल्याचे दिसून आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर रविवारी दुपारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page