खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बोगस व्हॉटअप अकाऊंट
जुहूच्या व्यावसायिकाची महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशी सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२४
मुंबई, – उपमुख्यमंत्री अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बोगस व्हॉटअप अकाऊंट सुरु करुन गैरवापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने विवेक अग्निहोत्री यांच्या तक्रार अर्जावरुन महाराष्ट्र सायबर सेलने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत जुहूच्या एका व्यावसायिकाला सायबर सेल पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली आहे. राहुल कांत असे या व्यावसायिकाचे नाव असून व्यवसायात आलेल्या नुकसानीतून त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
प्रफुल्ल पटेल हे अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विद्यमान खासदार आहे. काही दिवसांपासून त्यांच्या नावाने व्हॉटअप अकाऊंट उघडून त्यांचा फोटोचा वापर करुन अज्ञात व्यक्तीकडून त्याचा गैरवापर केला जात होता. लोकांकडून पैशांची मागणी करुन फसवणुक केली जात होती. २३ जुलैला हा प्रकार विवेक अग्निहोत्री यांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती प्रफुल्ल पटेल यांना दिली होती. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी महाराष्ट्र राज्य सायबर सेल पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना पोलिसांनी राहुल कांत या व्यावसायिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत राहुल हा हॉटेल व्यावसायिक असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत जुहूसारख्या पॉश परिसरात राहतो. कोरोना काळा त्याला हॉटेल व्यवसायात प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यात त्याची आई काही वर्षांपासून एका दुर्धर आजाराने ग्रस्त होती. तिच्या औषधोपचारावर प्रचंड खर्च येत होता. व्यवसायातील नुकसान आणि आईच्या उपचारासाठी झपटप पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्याने प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बोगस व्हॉटअप अकाऊंट सुरु केले होते. या अकाऊंटवरुन त्याने कतारच्या राजकुमाराच्या सल्लागाराकडे पैशांची मागणी करुन त्यांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर त्याने व्हॉटअप अकाऊंट बंद केले होते. त्याचा जबाब नोंदविण्यात आला असून या जबानीतून आणखीन काही धक्कादायक खुलासे होत आहे. त्यामुळे त्याची सायबर सेल पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले. लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील मोबाईल जप्त केला आहे.