मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ जानेवारी २०२५
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका ट्रकच्या धडकेने शालू रोहितकुमार यादव या २० वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मुलुंड परिसरात घडली. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी ट्रकचालक मोहम्मद जाकीर मोहम्मद शब्बीर खान याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता मुलुंड येथील श्रीराम सर्व्हिस रोड, श्रीरामपाडा, अमरनगरच्या टाटा पॉवर टॉवरसमोर झाला. शालू यादव ही मुलुंडच्या बजरंग गल्ली, अमरनगरात राहत होती. तिचे कामा अमरजीत मनिष यादव हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत असून त्यांना ती नियमित जेवणाचा डब्बा घेऊन जात होती. गुरुवारी सकाळी अकरा वाजता ती नेहमीप्रमाणे जेवणाचा डब्बा घेऊन घराबाहेर पडली. सव्वाअकरा वाजता ती टाटा पॉवरसमोरुन जात होती. यावेळी मागून भरवेगात आलेल्या टाटा कंपनीच्या ट्रकने तिला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने जवळच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला दुपारी साडेबारा वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी शालूचे वडिल रोहितकुमार यादव यांच्या तक्रारीवरुन मुलुंड पोलिसांनी ट्रकचालक मोहम्मद जाकीर खान याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने ट्रक चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. मोहम्मद जाकीर हा गुजरातच्या सुरत शहराचा रहिवाशी असून तो चालक म्हणून काम करत होता.